Tuesday, November 1, 2011

याचसाठी का केला होता अट्टाहास?

आजकाल खूप वेळा मला असा अनुभव येऊ लागलाय की ज्या गोष्टीसाठी खूप आतुरतेने वाट बघितलेली असते ती गोष्ट प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्यावर तितक समाधान नाही झालं. म्हणजे ती गोष्ट निश्चित चांगली असते, आवडलेली असते पण काहीतरी missing आहे असं वाटत राहत किंवा तो अनुभव जेवढा कल्पिला होता तितका अविस्मरणीय(exciting) नाही होत!


बऱ्याच बाबतीत होत असं - एखाद्या रेस्टॉरंट/ठिकाणा बद्दल खूप तारीफ ऐकलेली असते, पण तिथे गेल्या नंतर खूप वेगळा, नवीन अनुभव आल्यासारखं नाही वाटत! काही दिवसांनी आठवताना छान वाटत पण! :) Audi मध्ये बसण्याचा योग आला होता, गाडी आवडलीच पण त्याच्या अगोदर(किंबहुना आता सुद्धा रस्त्यावर गाडीकडे बघताना) जितकं छान वाटत होत तितक नाही वाटलं. तीच गोष्ट काही चित्रपट/पुस्तक, गायक/कलाकार यांच्याबाबतीत सुद्धा झाली :)

ह्याची काही कारणे मला वाटतात - पहिले म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल खूप कौतुक ऐकताना, त्याची एक प्रतिमा तयार होत असते आणि कदाचित ती प्रतिमा खूपच भव्य-दिव्य असते, त्यामुळे प्रथमदर्शनी थोडासा भ्रमनिरास झाल्यासारखे वाटते :) सापेक्षपणे बघता ती गोष्ट चांगली असतेच, पण 'first impression' च्या वेळी आपल्या मनातील प्रतिमेशी जुळत नसल्याने त्याचा पूर्ण आनंद नाही घेऊ शकत.
किंवा असंही असेल की माझ्या अपेक्षा खूप अवास्तवी होताहेत! दरवेळचा अनुभव हा अविस्मरणीयचं असेल असं नाही ना! 

कधी कधी असं वाटत की माझा पेला निश्चित भरलेला नाही, मग मी तो उपडा करून ठेवलाय का, की ज्यामुळे माझ अनुभव-विश्व समृद्ध करण्याच्या वाटा बंद करून टाकल्या आहेत? की नवीन काही आत्मसात करण्याची माझी क्षमताच उरलेली नाही आहे... 

एका प्रसिद्ध विधानाचा आधार घेऊन सांगावस वाटतंय की अशी एखादी सुंदर गोष्ट मिळण्याआधी आपण जी काही स्वप्न रंगवलेली असतात तीच जास्त सुखावह असतात! ती गोष्ट कधी कधी क्षणभंगुर ठरते पण आधीची ती ओढ/हुरहूर, ती साध्य करण्यासाठीचा प्रवास/धडपड, ती स्वप्नं ह्यातच जास्त आनंद मिळतो. :)

तुम्हाला काय वाटतं? तुमचा काही अनुभव?