Monday, September 10, 2012

राजांचा गड, गडांचा राजा!


बरेच दिवस काही लिहील नव्हत मध्ये १-२ वेळा वाटलं होत पण परत म्हटलं त्या पद्धतीच आधी लिहून झालंय त्यामुळे टाळल :) (TDKR@IMAX, आंबोली इ.)

कुठून डोक्यात आलं होत काय माहित पण राजगडला जावं अस शुक्रवारी वाटलं. कदाचित आंबोली भ्रमंती नंतर पावसाळी ट्रेकची इच्छा अपुरीच राहिली होती. जळगावच्या पाटलांनी उत्साह दाखवला म्हणून शिराळ्याच्या पाटलांकडून माहितीची विचारणा केली. दोघांनीही पाटीलकीला स्मरून ऐन वेळी ठेंगा दाखवला :D
तरीपण जुजबी माहिती मिळाली होती आणि मग मिपा/नेट वर बघितलं तर चिक्कार माहिती होती, ती वाचून तर जायची इच्छा प्रबळ झाली!
सकाळी उठून पण तळ्यात-मळ्यातच होत. शेवटी २ पराठे घेतले बांधून आणि म्हटलं एकटा तर एकटा निघू! ह्या अगोदर गेलो नसलो तरी परमुलुखात स्वारीला थोडेच जायचं होत, आणि नदी पार करायला पूल पण होता, यवनांसारखे अडथळे नव्हते पार करायचे! मग शेवटी १० वाजता किक मारली!(अरे हो, गाडीची बॅटरी बदलायची आहे बरेच दिवस :P)

खेड-शिवापूर च्या लूट-नाक्या(spelling mistake झाली वाटत :P) पर्यंत छान रेहमान ऐकत बऱ्याच दिवसांनी मस्त गाडी चालवायला मिळाली पण तिथे पाऊस आला आणि लक्षात आले, घात झाला! बहुधा पूर्ण दिवस ओलेत्याने जाणार. रस्ता विचारत, राजेंचे वारसदार नव्हे (स्वयंघोषित) राजेच जणू आणि त्यांचे खंदे समर्थक यांच्या बेलगाम ड्रायव्हिंग पासून सांभाळत वेल्हा रस्त्याने गुंजवणे या पायथ्याच्या गावी पोचलो. त्याच्या थोडंस आधी एक अप्रतिम नजारा होता! समोरच राजगड आहे हे माहित नव्हत आणि धुक्यामुळे लक्षात पण आलं नाही. नागमोडी रस्ता, सगळीकडे पसरलेली हिरवाई, धुक्यात हरवलेले डोंगर आणि मधून वाहणारी नदी! वाह... ७० किमी आल्याचं सार्थक वाटत होत, मग पुढे जे काही असेल ते तर बोनस :)

१२ वाजण्याच्या सुमारास गाडी लावल्यानंतर एक चहा ढकलला आणि रस्ता शोधत असताना खोचीकर पाटलांचा एक मित्र दिसल्यासारखे वाटले म्हणून बघितलं तर एक मराठमोळा ग्रुप होता. ते पण पहिल्यांदाच निघाले होते आणि जेवणाची सोय लावत होते. त्यांना विचारलं परत येणार ना संध्याकाळी, तर त्यांचा विचार होता! म्हटलं बघू येताना पण आता ह्यांच्या सोबतच निघू. तिथल्या हॉटेल मध्ये गडावरच्या असंख्य मावळ्यांच्या क्षुधाशांतीच काम असल्यामुळे त्यांनी बराच वेळ घेतला आणि मग १२:३० च्या दरम्यान निघालो. थोड्याच वेळात पावसाने पुन्हा हजेरी लावली. जर्किन घालावं तर गरम होत नाहीतर पाऊस कोसळतोय! अधिक महिन्यामुळे पावसाला पण confuse झाल होत त्यामुळे कधी मोठी सर यायची तर कधी श्रावणासारख्या हलक्या सरी आणि कधी उघडीप! थोड्या वेळाने कळेना की घामाने भिजलोय की पावसाने आणि नंतर तर पावसाचे काहीच वाटेना झाले! :)
 
चिखलातून वाट काढत असताना लक्षात आले होते की जगप्रसिद्ध Woodland shoes चा काही उपयोग नाही! ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी गत झाली होती! :)
आता हळू हळू ग्रुपमधल्या इतरांशी चांगल्या गप्पा चालू होत्या, असल्या अतरंगी मोहिमेचा म्होरक्या कोण यावरून कौतुकसोहळा चालू होता आणि पुन्हा असल काही न करण्याचा निश्चय निम्म्या वाटेत पोचायच्या आधी झाला होता :)
खालच्या गावातून गडावर जेवण पोचवणारे एक मामा आम्हाला एकदा म्हणाले अजून १५ मिनिटे आहे, आणि पुढच्या १५ मिनिटात ते मधून परत आले वर जाण्यासाठी तर म्हणाले हे काय १५ मिनिटावर. आणि त्यानंतर अर्ध्या तासानी आम्ही पोचलो... तरीपण त्यांनी सांगितलेल्या दीड तासाच्या अंदाजापेक्षा १५ मिनिटेच जास्त घेतली आम्ही :)
बहुंताश वाट खूप चढणीची नाही आणि ऊन नाही त्यामुळे वेळ लागत असला तरी अजून धीर सुटला नव्हता. चोर दरवाज्याचा शेवटचा टप्पा थोडा चढणीचा आहे अस ऐकल होत आणि मग बघितल्यावर कळलं की तो ‘थोडा’सा अवघड रेलिंग मुळे झालाय. नाहीतर आम्हाला अशक्यच होता! दगडांमधल्या खोबनीला पायरी म्हणायचे आणि एकावेळी एक माणूस जाऊ शकेल अशा रीतीने रेलिंगला पकडून वार सरकायचे. तो पार केल्यावर समोर येतो तो ‘चोर’ दरवाजाच! आणि त्यात नावाप्रमाणे एकदम वाकून जावं लागत. इथे पोचल्यावर सगळे एकदम खुश झालो कारण बऱ्यापैकी वेळेत पोचलो होतो. पायऱ्यांनी थोड वर आल्यावर तटबंदी दिसतानाच बहुधा तळ आहे अस वाटलं. त्याच्या कडेन जाताना धुक्यामुळे नीट नव्हत दिसत; पाउस तर एकदम दिमाखात कोसळत होता आणि एकदम लोभसवाणा वाटत होता. अजून वरती गेल्यावर पर्यटक निवासासमोर उभ राहिल्यावर पद्मावती तळ्याचा विस्तार बघून वाटलं की एवढ्या वरती अस तळ म्हणजे चमत्कारच आहे!
पोचेस्तोवर कसाबसा कड काढला होता त्यामुळे आधी पेटपूजा क्रमप्राप्त होती! पद्मावती मंदिर, रामेश्वर मंदिर एकदम भरलेले होते, त्यामुळे पर्यटक निवासाच्या व्हरांड्यात उभं राहून केलेल्या जेवणाची लज्जत वाढवली ती गडावर मिळालेल्या घट्ट दह्याने! पागोळ्यांच्या पाण्याने हात धुवून मंदिरात जागा मिळते का बघितली सॅक ठेवण्यासाठी. पण लक्षात आलं की इथली मंदिरं एकतर प्रोफेशनल ग्रुप्स किंवा राजगड सारख्या पवित्र ठिकाणी वेगळीच ‘नशा’ अनुभवण्यास आलेल्यांनी स्थानिक लोकांना हाताशी धरून काबीज केली होती.

वेळ कमी असल्यामुळे सगळा किल्ला बघून होणे शक्यच नव्हते. त्यामुळे ‘प्रमुख आकर्षण’ असलेला ‘भव्य’ बालेकिल्ला तरी बघून घ्यावा अस ठरलं. तिघेजणच तयार झालो. गडावरचे उरलेले अवशेष बघत निघालो होतो. भन्नाट वारा, मस्त धुक ह्यामध्ये काही दऱ्यांमध्ये फेकलेला प्लास्टिक/थर्मोकोल चा कचरा टोचणी लावत होता...



थोडा वेळ चालल्यानंतर मग सुरु झाली खरी परीक्षा! आधीच्या पेक्षा खडा चढ! एक गोष्ट चांगली होती म्हणजे धुक्यामुळे उंचीचा काही अंदाज येत नव्हता नाहीतर काही खरे नव्हते :) त्या एवढ्याश्या वाटेतून पाणी वाहत होते आणि नंतर तर रेलिंग चा पण आधार नव्हता एका ठिकाणी! एकदम रोमांचकारी अनुभव होता! वेळ अपुरा असल्यामुळे इथूनच परताव का असा विचार चालू होता. तरीपण थोड पुढे जाऊन बघितलं आणि बुरुज, दरवाजा दिसला! मग उरलेलं अंतर झटक्यात पार केलं आणि खरंच गड सर केल्याचा खूपच आनंद झाला! वाटत नव्हत की इथेपर्यंत पोचू म्हणून 8-)

ह्या दरवाज्यापासून अजून वरती गेल्यावर एक तळ आणि मंदिर आहे. तळ्याच्या गार पाण्याने तोंड धुतल्यावर सगळा शीण निघून गेला! धुक्यामुळे काहीच दिसत नव्हत नाहीतर इकडून खूप भारी दृश्य दिसेल अस वाटत. काही हरकत नाही, Trial run झाला आता! परत येणे होईलच तेव्हा बघू सर्व नीट!
आता परतीच्या वाटेवर कळू लागले की ‘उतरणे अवघड’ का आहे आणि विशेषतः पावसात! मघाशी जिथून चढून आलो होतो त्या पायऱ्या(?) बघून विश्वास बसत नव्हता की आपण चढून आलोय हे! आणि इथून कसेबसे उतरल्यावर confidence आला की आता खालच्या वाटेची चिंता नाही!


त्या मस्त धुंद, गूढ वातावरणाचा आनंद घेत चहा घेतला आणि खाली निघालो. विशेष म्हणजे एकदा पण कुठे धडपडलो नाही. पण चढायला लागला तितकाच वेळ लागला!
आता कधी एकदा घरी पोचतोय असे झाले होते. भिजलेले शूज, सॉक्समुळे माझे पाय पहिल्यांदा एवढे गोरे(!) दिसत होते :D

हायवेला पोचेपर्यंत अंधार पडला होता आणि वरुणराजा घरापर्यंत पोचवायला येणार असे दिसत होते! रात्रीची वेळ आणि पाउस म्हणजे आम्हा चार-डोळे वाल्यांसाठी ‘आधीच मर्कट, त्यात मद्य प्यायला’ अशी अवस्था! त्यात ठिकठिकाणचे खड्डे, रस्त्यावर आलेली माती यामुळे पुरती वाट लागली वाकडला पोचे पर्यंत.
सगळ अंग दुखत होत, पायांची आग होत होती पण डोक्यात विचार चालू होता – हिवाळ्यात परत कधी जायचं, राजांच्या गडावर! :)