Tuesday, March 30, 2010

साहित्य संमेलन - एक सुंदर अनुभव!

शाळेत असल्यापासून साहित्य संमेलनाच एक आकर्षण होत. आणि ह्या वर्षी तर ते पुण्य नगरीत घडत होत, त्यामुळे जायचंच अस ठरवलं होत.
विशेष कोणी उत्सुक नसणार ह्याचा अंदाज होता. बरोबर आहे म्हणा, एवढ उन तळपत असताना कोण कशाला वीकेंड वाया(!) घालवेल.
पण सुदैवाने माझ्यापेक्षा जास्त उत्साही आणि अनुभवी(दुसर संमेलन अटेंड करणारा ) 'अजय' होता सोबतीला!

शनिवारी दुपारी ४ वाजता मंडपात पोचेपर्यंत उन्हामुळे आणि परिसंवादातील वादामुळे वातावरण बरेच तापले होते. मा. मुख्यमंत्री 'इंडीयन टायमिंग' चा शिरस्ता मोडून लवकरच आले होते, पण जरा जास्तच लवकर आले - एक दिवस आधी.
आणि त्यांच्या उपस्थितीच्या प्रभावामुळे असेल की साहित्य संमेलनाच्या परंपरेनुसार असेल, सूत्रधार-वक्ते ह्यांच्यात चांगलच रणकंदन झालं
'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' आणि 'माध्यम तंत्रज्ञान ' अशा २ विषयांवर एकत्रित परिसंवाद चालू होता. डॉ. जब्बार पटेल, अवधूत गुप्ते, राजीव खांडेकर, निळू दामले, न्या. चपळगांवकर असे नामवंत वक्ते आपापली मते मांडत होते. त्यामध्ये डॉ नी अतिशय चांगला आणि आपल्या सर्वांच्या मनातला विचार मांडला - संमेलनाध्यक्षांची 'निवडणूक' होऊ नये, सन्मानाने निवड व्हावी.
न्या. चपळगांवकरांनी अतिशय मुलभूत गोष्ट सांगितली - मराठी टिकवायची असेल तर व्यवहारात तिचा वापर प्रत्येकाने आवर्जून केला पाहिजे. साहित्य, कला ही सर्व माध्यम आहेत. भाषा वाढवायची असेल तर तिचा वापर वाढवला पाहिजे.
मा. मुख्यमंत्र्यांनी मात्र लोकप्रिय घोषणा करून अनेक चांगल्या मुद्द्यांना बगल दिली, असो.

त्यानंतर पावले वळली ती पुस्तक-प्रदर्शनाकडे. अतिशय सुरेख मांडणी होती आणि गर्दी तर नुसती ओसंडून वाहत होती. साहजिकच काय घेऊ आणि काय नको अस झालं होत. बरीचशी खरेदी केली. मध्येच एका ठिकाणी 'आजरा' भागातील एका उत्पादनांच्या स्टॉलवर कोकम चा आस्वाद घेतला
अरे हो, तिकडे मकरंद अनासपुरे दिसला पुस्तके चाळताना!  ह्या भानगडीत सव्वा आठ कधी वाजले कळलेच नाही, आणि मंगेश पाडगावकरांचा संवाद आम्ही मिस केला. सकाळी पण न आल्यामुळे मेघना पेठे/श्याम मनोहर यांची मुलाखत हुकलीच होती...

आता सुरु झाला होता सर्व रसिक(!) प्रेक्षकांच्या आवडीचा सांस्कृतिक कार्यक्रम. पाय ठेवायला जागा नव्हती. झी मराठी वर सादर होणार असल्यामुळे त्यांच्या साच्यातलाच कार्यक्रम वाटत होता. बरेच चांगले कलाकार होते. संत रचना, नाट्य संगीत, प्रहसन यानंतर गाडी वळली ती मराठमोळ्या लावणी कडे! मीही लावणीचा रसिक आहे, ढोलकीची थाप ऐकल्यावर बेभान होतो. पण अस वाटत होत की 'फाटला गं कोना माझ्या चोळीचा' वर तूफान शिट्ट्या आणि वन्स मोअर ची जागा ही नव्हे. असो...

रविवारी सकाळी लवकरच पोचायचं अस ठरवून देखील (सुदैवाने) ११ वाजता पोचलो. कारण 'निमंत्रितांच कवीसंमेलन' वेळ टळून गेली तरी चालूच होत(आणि ते आटोपण्याची काही चिन्हे न दिसल्याने पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करून भोजनानंतर पुन्हा भरवण्यात आलं). अरे देवा! मला त्या वेळी कळलं की 'कविता वाचन' ह्या विषयावर इतके विनोद का आहेत! अर्ध्या तासातच मी पुरता गारद झालो होतो.
काहींची कविता म्हणजे निबंधवाचन होत तर काहीजण 'सारेगमप' च्या आवेशातच सूर लावत होते.
नंतर लक्षात आलं, की ह्यापेक्षा तिकडे जाता जाता कानावर आलेल्या 'कवी-कट्टा' वरच्या नवोदितांच्या रचना बर्‍या होत्या

त्या नंतर असलेल्या राजकीय आखाड्या पेक्षा पुस्तक प्रदर्शनात (पुन्हा) जाणं पसंद केल आम्ही. तरी ह्या परिसंवादाच्या शेवटी न्या. धर्माधिकारींच मराठी विषयी खूपच चपखल बोलण ऐकता आलं - त्यांनी एक शेर उद्धृत केला - "एक खता हम उम्रभर करते रहे, धूल तो चेहेरे पें थी; लेकिन हम आईना साफ करते रहे!" मराठीच्या मुद्द्यावर केवळ राजकारण करणार्‍या सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्या नेत्यांसमोरच त्यांनी चांगले बोल सुनावले.

दुपारच जेवण 'बापट' मध्येच घेऊन साहित्य संमेलनाचा फील कायम ठेवला

परत आलो तेव्हा कवी-संमेलनाच्या मंडपाकडे जाण्याच धाडस काही केल नाही. पण त्याच वेळी 'NRI मराठी साहित्य' यावरच्या परिसंवादाला जाता जाता हजेरी लावली.
नंतर राजहंस च्या स्टॉलवर अच्युत गोडबोले यांची स्वाक्षरी घेण्याचा योग, ही आमची झालेली साहित्यीकाशी भेट! त्यामुळे संमेलन सार्थकी लागले

संध्याकाळच्या सत्रात बिग-बी साठी होणार्‍या गर्दीमुळे आम्ही काढता पाय घेतला, त्यापेक्षा टीव्ही वर पाहणे पसंद केल!
ह्या संमेलनातल एकंदरीत नियोजन आवडल. मंडप/आसन व्यवस्था, ध्वनीव्यवस्था, शुद्ध पाणी, स्वच्छतागृह इ. सर्वच गोष्टी.
संयोजकांना धन्यवाद!

अशा रीतीने पूर्ण का नसेना पण थोडासा सहभाग नोंदवून; एक चांगला अनुभव गाठीशी आणि पुस्तकांच गाठोड पाठीशी बांधून आम्ही घरी परतलो!
बघू परत कधी योग येतो! आता वाट बघतोय, कोल्हापूर ला कधी होतंय संमेलन याची!