Saturday, December 25, 2010

'डार्क नाईट' माझ्या नजरेतून - जोकर आणि लखोबा :)

काल पुन्हा एकदा ' डार्क नाईट' पाहिला. दर वेळी तितकाच आवडतो आणि अजून जास्त पैलू समजतात अस वाटतंय :)
मला आठवतंय पहिल्यांदा हा सिनेमा २००८ साली 'विजय टॉकीज' ला हिंदी मध्ये पाहिला होता. आम्ही - जण होतो आणि पावसाळा असल्यामुळे शेजारीच एका बादलीत टप-टप पडणाऱ्या थेंबांच मस्त बॅकग्राउंड म्युजिक चालू होत! त्यामुळे मंगेश मला अजूनही शिव्या घालतो अशा ठिकाणी नेल्याबद्दल. त्यात मी बॅटमॅन चा पहिला भाग पाहिला नव्हता किंवा कथेची पुसटशीही कल्पना नव्हती त्यामुळे खर सांगायचं तर बराचसा चित्रपट डोक्यावरून गेला होता. नंतर मग कधीतरी दोन्ही भाग सलग पाहिले आणि जोकर, नोलान ह्यांच्यावर फिदाच झालो!
ख्रिस्तोफर नोलान ने इतक्या वेगळ्या तऱ्हेने बॅटमॅनची कथा सादर केलीय की तो एक कॉमिकपट राहतच नाही. वास्तवातल्या अनेक गोष्टींशी बेमालूमपणे सांगड घालून तो दाखवून देतो की प्रत्येक गोष्टीला चांगली-वाईट बाजू असते. आपल्या प्रत्येकामध्ये एक सैतान दडलेला असतोच. ग्रे-शेड ह्याहून उत्तम उदाहरण मी अजून नाही पाहिलं. :)
त्यामुळेच इथला 'व्हाईट हिरो' - हार्वी डेन्ट शेवटी वाईटाकडे झुकताना दाखवलाय.

ह्या चित्रपटातले डायलॉगज तर मला इतके आवडले की काही वेळा फेसबुक/ओर्कुट वर टाकले होते. 'Do I look like a guy with a plan?' हा तर अप्रतिमच आहे. 'You either die a hero or you live long enough to see yourself become the villain.' हे वाक्य मला एकदम पटलं. गांधीं(विषयी)-वादात पडायचं नसल तरी मला सुभाषबाबू आणि गांधी ह्या बाबतीत ते एकदम सुसंगत वाटत. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही सर्वोच्च स्थानावर असतानाच निवृत्ती घेण चांगल. नाहीतर (आपल्याच चाहत्यांकडून) आपली होणारी वाताहात पाहावी लागते याची आपल्याकडे अनेक उदाहरणे आहेत. असाच अजून एक जोकर च्या तोंडी असणारा जबरी डायलॉग म्हणजे 'If you're good at something, never do it for free.' मला वाटतय आजच्या कॉर्पोरेट युगात तर हा मंत्र सगळेचजण कवटाळतात :)




चित्रपटभर तसा कमी वावर असूनदेखील सर्वात जास्त प्रभाव पाडतो तो जोकर! जोकरचे संवाद ऐकून बऱ्याच वेळी बरोबर काय आणि चूक काय असा संभ्रम पडावा अशी स्थिती निर्माण होते. Heath Ledger ने ही भूमिका खरच अजरामर केलीय! त्याची बोलण्याची शैली, देहबोली निव्वळ लाजवाब आहे
आपल्या समाज व्यवस्थेमधले कच्चे दुवे त्याने चांगलेच हेरलेत. त्यामुळेच त्याला कुठलीही गोष्ट 'प्लॅन' नुसार घडलेली आवडत नाही अस सांगतो. ' Introduce a little anarchy. Upset the established order, and everything becomes chaos.' - हे तर हरघडी आपण अनुभवतो :) मागच्या पोस्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे पुण्यातल्या वाहतुकीचाही असाच 'chaos'  होतो :)
जोकरचा अजून एक बिनतोड युक्तिवाद म्हणजे बॅटमॅन असेल तरच जोकर च्या असण्याला अर्थ आहे!!!


काल मला जोकर ला पाहताना अचानक 'लखोबा लोखंडे' ची आठवण झाली! (मी जोकर, लखोबा लोखंडे असे एकेरी उल्लेख करतोय खर, पण ह्या दोन्ही अभिनेत्यांविषयी प्रचंड आदर बाळगूनच. त्यांना एकेरी बोलावण्यातच त्या व्यक्तिरेखेच यश आहे अस मला वाटत). हां, तर मला 'तो मी नव्हेच' मधल्या 'प्रभाकर पणशीकरांनी' अजरामर केलेल्या व्यक्तिरेखेची का आठवण व्हावी? खर तर तशी ह्या दोघा खल(!)नायकांची जातकुळी वेगळी आहे. एकाला वेगवेगळ्या रुपात जाऊन गुन्हे करून सहीसलामत सुटण्यात आनंद मिळतो तर दुसरा आपली ओळख मागे ठेवून आपली दहशत निर्माण करत राहतो. पण दोघेही आपल्या खऱ्या रुपात पुढे येणे टाळतात

ह्या दोघांमध्ये मला काही बाबतीत कमालीच साम्य आढळलं ते म्हणजे अतिशय थंड डोक्याने वावरणे आणि कमालीचा बेफिकीरपणा! 'तो मी नव्हेच' खूप वर्षांपूर्वी पाहिलंय, पण लखोबा लोखंडे चा कोर्टातला वावर आणि देहबोली अजून लक्षात आहे. त्याच्यावरचे आरोप वाचून दाखवून असताना 'काय चिल्लर गोष्टी चालू आहेत' अशा अर्थाचे प्रेक्षकांकडे बघून टाकलेले कटाक्ष, टोपीशी चालू असलेला चाळा आणि हाताच्या बोटांची हालचाल पाहिली की तो सगळ्यांना अगदी वेड्यात(मापात) काढतोय अस वाटत :) त्यातला अस्सल बेरकीपणा पणशीकरांनी अगदी तंतोतंत उभा केलाय.
तसाच जोकर हॉस्पिटल उडवून बाहेर येतानाच्या त्याच्या प्रतिक्रिया किंवा Bruce Wayne च्या पार्टी मधला प्रसंग आठवा!
अत्रेंच्या लिखाणावर बोलण्याची पात्रता नाही पण माझी 'नरोटी' अशी आहे की लखोबा लोखंडे जे काही करतो ते काही निव्वळ पैशासाठी नाही. त्याला त्या सगळ्यातून एक आनंद मिळत असावा. जस जोकर पैशाच्या राशीला आग लावतो आणि म्हणतो की मी फक्त माझा वाटा जाळलाय! वाह रे पठ्ठ्या! :)


ह्या दोन्ही महान कलाकृती आहेत त्यामुळे अजून पाहिल्या नसतील तर जरूर पहाच आणि एकदा पाहिलं असेल तर मला खात्री आहे पुन्हा पाहायला नक्की आवडेल तुम्हाला :)
आपल्या प्रतिक्रियांच स्वागत! :)
 

ता.. 'नरोटी' हा शब्द मी 'खोपडी' अशा अर्थाने वापरला - इरावती कर्वे यांच्या 'युगांत' मधून ढापून :p (सौजन्य: सुजयशी झालेली चर्चा :) )
ह्याच पुस्तकातून मला माझी बडबड बिनधास्त ब्लॉग वर टाकण्यासाठी प्रेरणा मिळाली :D त्या म्हणतात -  "बोलण्या-लिहिण्या मागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे हा." 

(Batman च उत्तम परीक्षण इथे पहा - http://apalacinemascope.blogspot.com/2008/08/blog-post_18.html ) 

Monday, December 13, 2010

पुण्याचं ट्रॅफिक

गेली काही वर्षे पुण्यात राहिल्यानंतर काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात, किंवा खूप त्रास देतात असाच म्हणावं लागेल :)
कदाचित असाच अनुभव इतर शहरातही येत असेल म्हणा पण पुण्यात जरा खासच! :)

जशी ५ मैलावर भाषा बदलते म्हणतात तसं पुण्यातही काही गोष्टी भागानुसार बदलतात पण बऱ्याचशा गोष्टी मात्र सगळीकडे सापडतील.
सुरुवातच करायची झाली तर ट्रॅफिक सिग्नलचीच गोष्ट घ्या! पुण्यात येऊन सिग्नल पाळणे म्हणजे तुम्ही पुण्यातले नाही हे दाखवण्याचा उत्तम उपाय असंच गणित झाल आहे! तुम्हाला कुठल्याही दिशेला वळायच असू दे, तुम्ही तीच लेन फॉलो केली पाहिजे अस काही नाही. उजवीकडे वळणारी पी.एम.टी. बस बिनदिक्कतपणे अगदी डावीकडून मुरका मारत सर्व वाहनांच्या समोरून जाते तिथे दुचाकीवाले कसे मागे असतील. जिथून जागा मिळेल तिथून गाडी आधी पुढे दामटणे, कुठे वळायच ते नंतर बघू. त्यामुळे लेन वगैरे प्रकार पुण्यात चालू द्यायचे नाहीत अस ठरवलं आहे(जेम्स लेन सह :D )
बरं, काही सिग्नलला समोर उलट-गणती चालू असते पण तरीसुद्धा कोणीही इंजिन बंद करण्याची तसदी अजिबात घेणार नाहीत. मग बटनस्टार्ट असो नाहीतर हात-स्टार्ट रिक्षा! भका-भका धूर ओकत बाकी सर्वांची तोंडं काळी करणार्‍या लोकांच्या तोंडाला काळं का नाही फासत म्हणतो मी! :-P
आणि ट्रॅफिक हवालदार तर नव्या कोऱ्या 4-stroke बाईक कडे PUC नाही म्हणून दंड वसूल करतील पण रिक्षाचा धूर कधी दिसणार नाही त्यांना. वाहतूक नियमन करण्यापेक्षा पैसे उकळण्यातच जास्त रस असतो ह्यांना. आणि ट्रॅफिक वार्डन तर निव्वळ पंटरगिरी साठीच नेमले आहेत का असा प्रश्न पडतो.

पुण्यातल्या रस्त्यांइतका माजोरडेपणा कुठे सापडणार नाही खरा! रस्त्यावरून कशीही गाडी चालवा! 'इंडिकेटर नावाच्या शोभेच्या वस्तूचा वापर कशाला करायचा?' असा उच्च विचार सर्व चालक (विशेषतः दुचाकी आणि तीनचाकी) करत असल्यामुळे आपण आपसूक मनकवडे होतो. म्हणजे समोरच्या दुचाकीवरील माणसाच्या हावभावाकडे आपण लक्ष द्यायचं. त्याने थोडस उजवीकडे/मागे बघत बघत गाडी घेतली की आपण समजायचं, महाशयांना उजवीकडे वळायच आहे त्यामुळे ओव्हरटेकिंग च्या फंदात न पडणे! अन्यथा, "एवढा मोठा सिग्नल(?) कळत नाही का?" अशी एकदम (अ)सभ्य भाषेत; किमानपक्षी जळजळीत कटाक्षात विचारणा होऊ शकते.

पण सगळेच असे नाहीत हं, आपले काही मित्र इंडिकेटर लावतात ना; मग त्याना रस्त्याच्या ह्या बाजूकडून त्या बाजूला बिनधास्त वळण्याचा परवाना मिळतो. "मी इंडिकेटर दिलाय ना, मग मागे/पुढे न बघता मी वळणारच . तुम्हाला नीट बघून येता येत नाही का!!!!" आता बोला. :) त्यात तर काही जणांना मी पासिंग लाईट लावला म्हणजे मला साईड मिळालीच पाहिजे असा आग्रह असतो.

ह्या सर्वापेक्षा जास्त माज बघायचा असेल तर पी.एम.टी. ला ओव्हरटेक करायचा किंवा हॉर्न देण्याचा प्रयत्न करावा! ह्या बस चालकांना रस्त्यावर मारलेल्या लोकांच्या हिशोबात बोनस मिळत असावा, आणि रस्त्याच्या कडेला थांब्या वर जर नीट बस थांबवली तर मेमो देत असतील. कंडक्टर ने १-२-३ रु सुट्टे परत दिल्यास त्या दिवशीचा पगार कापत असतील :)

बर ह्या सर्वात चालत जाणारे लोकही कमी नाहीत! पुणे स्टेशन च्या समोर भुयारी मार्ग बांधलाय पण लहान मुले, स्त्रिया, वृद्ध यांच्यासह सर्वजण त्या उंच दुभाजकावरून उडया मारत रस्ता ओलांडत असतात!

पुण्यातला लोकांना ज्या काही गोष्टी प्रिय आहेत त्यापैकी एक म्हणजे त्यांना chaos करायला खूप आवडत. एखाद्या ठिकाणी काहीतरी ट्रॅफिकचा प्रॉब्लेम झाल्यावर जर २ मिनिट शांत थांबल तर लगेच सर्व सुरळीत होईल ना. मग चला पुढे. प्रत्येकाने आपली गाडी पुढे दामटायची. मग मस्त पैकी deadlock तयार होत! विशेषतः मुख्य चौकातला सिग्नल बंद असेल तर हमखास होणारा प्रकार. "आओ मिलके chaos बनाये!"
एकंदरीत रस्त्यावरील इतर लोकांचा विचार करणे ही प्रवृत्ती खूप अभावाने आढळते. ह्याच अजून एक त्रासदायक उदाहरण म्हणजे संधिप्रकाश संपून लख्ख(!) रात्र झाली तरी लोकांना आपल्या गाडीचे दिवे लावायला आवडत नाही! इतका प्रकाश आहे ना रस्त्यावर मग कशाला उगाच वाया घालावा! अरे बाबानो/अगं बायानो, तुम्हाला दिसत असेल सर्व काही; पण बाकीच्यांना तुमची गाडी दिसण्यासाठी तरी लाईट लावा ना! आणि असे लोक नो एन्ट्री मधून मागचा पुढचा विचार न करता एकदम सुसाट येत असतात. आपणच काळजी करायची आपली; आणि पर्यायाने त्यांचीही.
बर अशा महाभागांना किंवा ट्रिपल सीट अचानक आडवे येणार्‍यांना काही बोलायचीही सोय नाही. 'आपले कुठे काय चुकले!' अशा आविर्भावात भांडायला तयारच. एकदा  तर एक मध्यमवयीन गृहस्थ गाडीवरून मोठ्ठा ऊस(बहुधा तुळशी लग्नासाठी) घेऊन जाताना एका कॉलेज तरुणाला ऊस लागला म्हणून त्याने काहीतरी विचारलं तर भर रस्त्यात वाद घालत होते(सपत्नीक!).

मी सुरुवातीला म्हणालो ना की काही गोष्टी पुण्याच्या विविध भागाप्रमाणे बदलतात, तर काही निरीक्षणे :)

धनकवडी ते बाणेर असा पुणे-दर्शन मार्ग घ्यायचो त्यामुळे बरेच अनुभव यायचे. संध्याकाळी डेक्कनला पोचे पर्यंत जरी ट्रॅफिक जास्त असलं तरी त्यातल्या त्यात बर म्हणजे थोडी शिस्त असायची. एकदा का नदी ओलांडली की सगळा गोंधळच. रस्ते छोटे असल्यामुळे व्हायचं तसं पण तरीसुद्धा पेठेत असल्यामुळे बरी स्थिती असायची. पण पर्वती/नीलायम ते धनकवडी म्हणजे कहर! इकडे शाहू कॉलेज असल्यामुळे सगळेच शाहू महाराज! अतिशय बेशिस्त वाहने. पोलीस स्टेशन च्या समोरून बिनधास्त नो एन्ट्री मधून वाहतूक चालू असते. रस्ता ओलांडताना इकडे तिकडे पाहणे नाही!
नाशिक रोड ला बघितलं वेगळीच तऱ्हा , दुभाजक असलेला मोठ्ठा रस्ता, पण मग ओलांडण्यासाठी वळसा कोण घालणार. चला उलट्या दिशेने मोट्ठ्याने हॉर्न वाजवत...

तर अस हे पुण्याचं ट्रॅफिक. मी सुरुवातीला 'पुणेरी ट्रॅफिक' अस शीर्षक दिल होत पण नंतर वाटलं की त्यापेक्षा 'पुण्याचं ट्रॅफिक' हेच जास्त बरोबर वाटतंय. :)
असो, हळू हळू थोडे बदल होतील अशी अपेक्षा करुयात आणि आपलाही हातभार लावूयात.
पण वाढती वाहनसंख्या आणि अपुरे रस्ते ह्याच्या बरोबरीने लोकांच्या मानसिकतेला जोपर्यंत लगाम बसत नाही तोपर्यंत ही स्थिती सुधारणे जरा अवघडच...