Wednesday, June 9, 2010

मारुतीचा माळ!

शाळेत नसल्यामुळे मे महिन्याच्या सुट्टीचा फील काही आजकाल येत नाही, त्यामुळे १५ दिवसाने परत गावी चक्कर टाकून थोडाफार सुट्टीमय होण्याचा प्रयत्न चालू होता :)
शनिवारी संध्याकाळी माझ्या गावाकडून(बाळेघोल) कापशीला चाललो होतो. हा तसा आमचा नेहमीचा रस्ता. ८ वी ते १० वी ह्याच रस्त्यावरून सायकल भ्रमंती असायची. भ्रमंतीच ती, कारण चालत जाणारे आमच्या आधी शाळेतून घरी पोचायचे :D 
ह्या २ गावांमध्ये साधारण ४-५ कि.मी. अंतर आहे आणि बरोबर मध्यावर एक फोंडा माळ आहे! आणि तिथेच आहे एक छोटेसे मारुतीचे देऊळ. म्हणून त्याला मारुतीचा माळ म्हणतात किंवा मारुतीला 'माळ मारुती' म्हणतात :)

शनिवार असल्यामुळे जाता जाता मंदिराकडे गाडी घेतली. रस्त्यापासून ५० मी अगदी मोकळ मैदान(!) आणि मग मंदिर आहे. ह्या मंदिराच वैशिष्ट्य म्हणजे समोर नंदी आहे, जो सहसा शंकराच्या मंदिरासमोर असतो. तशा ह्या मंदिरा बद्दल अनेक दंतकथा आहेत - उदा. काही चोरांनी एका रात्रीत ते मंदिर बांधले आणि सकाळ झाल्यामुळे कळस राहून गेला इ. पण दोन्ही गावच्या लोकांसाठी विशेषतः ज्यांच शेत ह्या बाजूला आहे त्यांच्यासाठी हे एक श्रद्धास्थान आहे.
अगदी छोटेखानी गाभारा आहे आणि आत भरपूर तेल, शेंदूर माखलेली मारुतीची साधारण ४-५ फूट उंच दगडातील मूर्ती आहे. गावाकडून येताना खुडून आणलेल्या रुईच्या पानांचे हार शनिवारी हमखास दिसतात. काही वर्षांपूर्वी लोकांनी एकत्र येऊन सभोवताली फारशी आणि कट्टा बांधला आहे.
दर्शन घेऊन बाहेर ह्या कट्ट्यावर विसावलो. साडेसहाचा सुमार असावा. सूर्य मावळतीला गेला होता, संधीप्रकाशात समोरच्या मोकळ्या रानाकडे आणि दूरच्या डोंगराकडे बघायला छान वाटत होत. उजवीकडे काही काळे पांढरे ढग उगाच पावसाची आस लावत होते. आणि त्या सुखद वातावरणात खरी बहार आणली होती ती वाऱ्याच्या सुखद झुळकांनी... मान्सूनपूर्व की काय म्हणतात तसा असेल बहुधा पण उन्हाळा सरत असताना येणाऱ्या त्या वारयाने अक्षरशः मोहरून टाकल होत.
शेतावरून परतणारी अगदी तुरळक माणसं आणि गावाकडे परतणाऱ्या काही मोटारसायकली यांचा अपवाद सोडला तर अगदी निशब्द होत सगळीकडे. आणि त्या नीरव शांततेत इतक प्रसन्न वाटत होत की असच बसून राहावास वाटत होत.
मग शाळेतले दिवस आठवले. शनिवारी इथे आलेली पायी सहल. शेजारच्या चिंचेच्या झाडावर चढून केलेला दंगा. सायकल/बाईक शिकण्यासाठी केलेले खटाटोप. क्रिकेट ची विशेष आवड नसतानाही उगाचच माळावरच्या मॅचेसना लावलेली हजेरी. श्रावणातल्या शेवटच्या शनिवारी इथे खाल्लेला खिरीचा महाप्रसाद. आणि अवकाळी पावसाच्या वेळी उघड्या माळावर ह्या मंदिराने दिलेला आसरा...
खूप आठवणी जोडल्या आहेत ह्या ठिकाणाशी! वाटत होत घरातली सायकल घेऊन परत हायस्कूलला जाव, आणि एकाही चढाला न उतरता घरी जाण्याची स्पर्धा लावावी! :)
ती शांतता इतकी मोहक होती की सगळ्या गोष्टींचा विसर पडावा. आणि काही वेळाने उगाच वाटू लागले की अरे आपण तिकडे पुण्यात काय करतोय? तिथे आठवडाभर त्रास घेऊन जर काही हव हवस वाटत असेल तर ही शांतता, हे समाधान... शहरा मध्ये राहून काय कमावतोय आणि काय गमावतोय ह्याचा हिशोब लागत नव्हता. कदाचित अनेकांनी सांगितलेले सत्य मला आता गवसत होते - जिथून सुरुवात होते तिथेच परत याव लागत...

असो... शेवटी पूर्ण अंधार पडला, घरी वाट बघत असतील आणि अजून मी कापशीला गेलोच नव्हतो त्यामुळे पाय निघत नव्हता तरी गाडीला किक मारून त्या शांततेचा भंग करावा लागला :(
हा माळ अंधारात सुद्धा खूप छान दिसतो. मागच्या वेळी पहाटे कापशीहून घरी जाताना इतक सुरेख चांदण पडल होत की मला लाईट्स बंद करून गाडी चालवण्याचा मोह आवरता आला नाही :) आजही रात्री परतताना थोडा वेळ थांबून चांदण्या मोजण्याचा प्रयत्न केला आणि मग घरी परतलो, काही रम्य आठवणी सोबत घेऊन...
बघू परत कधी अशी संध्याकाळ अनुभवता येते... श्रावणात मजा येते, सगळीकडे पसरलेली हिरवाई पाहायला. तेव्हा फोटो टाकेनच! :)

Tuesday, March 30, 2010

साहित्य संमेलन - एक सुंदर अनुभव!

शाळेत असल्यापासून साहित्य संमेलनाच एक आकर्षण होत. आणि ह्या वर्षी तर ते पुण्य नगरीत घडत होत, त्यामुळे जायचंच अस ठरवलं होत.
विशेष कोणी उत्सुक नसणार ह्याचा अंदाज होता. बरोबर आहे म्हणा, एवढ उन तळपत असताना कोण कशाला वीकेंड वाया(!) घालवेल.
पण सुदैवाने माझ्यापेक्षा जास्त उत्साही आणि अनुभवी(दुसर संमेलन अटेंड करणारा ) 'अजय' होता सोबतीला!

शनिवारी दुपारी ४ वाजता मंडपात पोचेपर्यंत उन्हामुळे आणि परिसंवादातील वादामुळे वातावरण बरेच तापले होते. मा. मुख्यमंत्री 'इंडीयन टायमिंग' चा शिरस्ता मोडून लवकरच आले होते, पण जरा जास्तच लवकर आले - एक दिवस आधी.
आणि त्यांच्या उपस्थितीच्या प्रभावामुळे असेल की साहित्य संमेलनाच्या परंपरेनुसार असेल, सूत्रधार-वक्ते ह्यांच्यात चांगलच रणकंदन झालं
'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' आणि 'माध्यम तंत्रज्ञान ' अशा २ विषयांवर एकत्रित परिसंवाद चालू होता. डॉ. जब्बार पटेल, अवधूत गुप्ते, राजीव खांडेकर, निळू दामले, न्या. चपळगांवकर असे नामवंत वक्ते आपापली मते मांडत होते. त्यामध्ये डॉ नी अतिशय चांगला आणि आपल्या सर्वांच्या मनातला विचार मांडला - संमेलनाध्यक्षांची 'निवडणूक' होऊ नये, सन्मानाने निवड व्हावी.
न्या. चपळगांवकरांनी अतिशय मुलभूत गोष्ट सांगितली - मराठी टिकवायची असेल तर व्यवहारात तिचा वापर प्रत्येकाने आवर्जून केला पाहिजे. साहित्य, कला ही सर्व माध्यम आहेत. भाषा वाढवायची असेल तर तिचा वापर वाढवला पाहिजे.
मा. मुख्यमंत्र्यांनी मात्र लोकप्रिय घोषणा करून अनेक चांगल्या मुद्द्यांना बगल दिली, असो.

त्यानंतर पावले वळली ती पुस्तक-प्रदर्शनाकडे. अतिशय सुरेख मांडणी होती आणि गर्दी तर नुसती ओसंडून वाहत होती. साहजिकच काय घेऊ आणि काय नको अस झालं होत. बरीचशी खरेदी केली. मध्येच एका ठिकाणी 'आजरा' भागातील एका उत्पादनांच्या स्टॉलवर कोकम चा आस्वाद घेतला
अरे हो, तिकडे मकरंद अनासपुरे दिसला पुस्तके चाळताना!  ह्या भानगडीत सव्वा आठ कधी वाजले कळलेच नाही, आणि मंगेश पाडगावकरांचा संवाद आम्ही मिस केला. सकाळी पण न आल्यामुळे मेघना पेठे/श्याम मनोहर यांची मुलाखत हुकलीच होती...

आता सुरु झाला होता सर्व रसिक(!) प्रेक्षकांच्या आवडीचा सांस्कृतिक कार्यक्रम. पाय ठेवायला जागा नव्हती. झी मराठी वर सादर होणार असल्यामुळे त्यांच्या साच्यातलाच कार्यक्रम वाटत होता. बरेच चांगले कलाकार होते. संत रचना, नाट्य संगीत, प्रहसन यानंतर गाडी वळली ती मराठमोळ्या लावणी कडे! मीही लावणीचा रसिक आहे, ढोलकीची थाप ऐकल्यावर बेभान होतो. पण अस वाटत होत की 'फाटला गं कोना माझ्या चोळीचा' वर तूफान शिट्ट्या आणि वन्स मोअर ची जागा ही नव्हे. असो...

रविवारी सकाळी लवकरच पोचायचं अस ठरवून देखील (सुदैवाने) ११ वाजता पोचलो. कारण 'निमंत्रितांच कवीसंमेलन' वेळ टळून गेली तरी चालूच होत(आणि ते आटोपण्याची काही चिन्हे न दिसल्याने पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करून भोजनानंतर पुन्हा भरवण्यात आलं). अरे देवा! मला त्या वेळी कळलं की 'कविता वाचन' ह्या विषयावर इतके विनोद का आहेत! अर्ध्या तासातच मी पुरता गारद झालो होतो.
काहींची कविता म्हणजे निबंधवाचन होत तर काहीजण 'सारेगमप' च्या आवेशातच सूर लावत होते.
नंतर लक्षात आलं, की ह्यापेक्षा तिकडे जाता जाता कानावर आलेल्या 'कवी-कट्टा' वरच्या नवोदितांच्या रचना बर्‍या होत्या

त्या नंतर असलेल्या राजकीय आखाड्या पेक्षा पुस्तक प्रदर्शनात (पुन्हा) जाणं पसंद केल आम्ही. तरी ह्या परिसंवादाच्या शेवटी न्या. धर्माधिकारींच मराठी विषयी खूपच चपखल बोलण ऐकता आलं - त्यांनी एक शेर उद्धृत केला - "एक खता हम उम्रभर करते रहे, धूल तो चेहेरे पें थी; लेकिन हम आईना साफ करते रहे!" मराठीच्या मुद्द्यावर केवळ राजकारण करणार्‍या सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्या नेत्यांसमोरच त्यांनी चांगले बोल सुनावले.

दुपारच जेवण 'बापट' मध्येच घेऊन साहित्य संमेलनाचा फील कायम ठेवला

परत आलो तेव्हा कवी-संमेलनाच्या मंडपाकडे जाण्याच धाडस काही केल नाही. पण त्याच वेळी 'NRI मराठी साहित्य' यावरच्या परिसंवादाला जाता जाता हजेरी लावली.
नंतर राजहंस च्या स्टॉलवर अच्युत गोडबोले यांची स्वाक्षरी घेण्याचा योग, ही आमची झालेली साहित्यीकाशी भेट! त्यामुळे संमेलन सार्थकी लागले

संध्याकाळच्या सत्रात बिग-बी साठी होणार्‍या गर्दीमुळे आम्ही काढता पाय घेतला, त्यापेक्षा टीव्ही वर पाहणे पसंद केल!
ह्या संमेलनातल एकंदरीत नियोजन आवडल. मंडप/आसन व्यवस्था, ध्वनीव्यवस्था, शुद्ध पाणी, स्वच्छतागृह इ. सर्वच गोष्टी.
संयोजकांना धन्यवाद!

अशा रीतीने पूर्ण का नसेना पण थोडासा सहभाग नोंदवून; एक चांगला अनुभव गाठीशी आणि पुस्तकांच गाठोड पाठीशी बांधून आम्ही घरी परतलो!
बघू परत कधी योग येतो! आता वाट बघतोय, कोल्हापूर ला कधी होतंय संमेलन याची!

Thursday, July 23, 2009

आणि मी चक्क लकी ठरलो :-)

काही घटना -
- आज सकाळी मी कोंढव्याहून येताना एका बाईकस्वाराला आपले शूज सांभाळण्यासाठी त्याच्यावर प्लास्टिक पिशवी घालून गाडी चालवताना पाहिलं आयडिया आवडली
- तर आता प्रश्न असा आहे की माझ ऑफिस बाणेर रोडला असताना मी कोंढव्याला कशाला गेलो होतो
- तर मी सोफिया नामक तरुणीला भेटायला गेलो होतो. तिचा फोन आला काल, की ये म्हणून
- तिच्याबरोबर कॉफी घेतली, आणि थोड फिरलो पण! (सकाळ सकाळी??????)
- नंतर तिने मला एक छानसं(!) गिफ्ट पण दिल... आयला आज valentine day पण नाही



- थांबा, तुम्ही उगाच काही कल्पना चित्र रंगवण्या अगोदर सांगतो - २-३ आठवड्या पूर्वी मी रेडीओ मिर्ची ला कुठल्या तरी कार्यक्रमात स-म-स केला होता(बस मध्ये येण्याच्या अनेक फायद्यांपैकी एक!).
- दुसऱ्या दिवशी फोन आला होता की तुम्ही विनर आहे आणि उद्या अनाउन्स केल जाईल वगैरे. पण तस काहीच झाल नाही!
- मग मी 'गंडवलं वाटत'(तुम्ही 'नेहमी प्रमाणे' अस म्हणालातं का???) असं म्हणून विसरून गेलो.
- तर काल संध्याकाळी सोफिया नामक कन्येचा फोन आला आणि ती म्हणाली की आमच्या ऑफिस ला येऊन प्राईझ घेऊन जा
- एखाद मूवी तिकीट किंवा तत्सम फुटकळ वस्तू असेल अशा अपेक्षेने मी आज गेलो.
- मग तिने मला 'would u like to have some coffee(or water - मला आलेला घाम बघून बहुधा!) अस विचारलं!
- मी पडत्या फळाची आज्ञा मानून (जशी काय मशीन ची कॉफी कधी पिलीच नाही अशा थाटात) ती कॉफी घेतली
- दरम्यान आर जे आदिती (नुसतचं) 'हाय' करून गेली; आणि मला सोफिया ने स्टूडीओ ची छोटेखानी सैर घडवून आणली.
- आणि सरतेशेवटी, माझा ओळखीचा पुरावा बघून तिने माझ गिफ्ट मला सुपूर्द केलं(एका छोटेखानी समारंभात - २च व्यक्तींच्या )
Its a Beetel cordless phone
The show was 'Tech Talk' or something like that sponsored by Beetel.

बरेच दिवस घरी एखादा कॉर्डलेस घ्यावा असा विचार होताचं

आणि अशा रीतीने पहिल्यांदा मी कुठल्यातरी स्पर्धेमध्ये(!) चक्क लकी ठरलो होतो

-सचिन