Wednesday, January 5, 2011

एका तळ्यात होती ...

काल सारेगमप little champs बघत होतो. आधीच्या पर्वाशी नकळत तुलना होतेच पण आताचे स्पर्धकसुद्धा चांगले आहेत. शरयू दातेने 'एका तळ्यात होती' म्हटलं.
मला हे गाणं खूप आवडत. गदिमांचे अगदी साधे
पण अर्थपूर्ण शब्द, श्रीनिवास खळेंची मोहक चाल आणि आशाताईंचा नितांतसुंदर आवाज! एक अफलातून combination आहे. 
 
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरुप वेडे पिल्लूं तयांत एक

सुरुवातीला ह्या दोन ओळीच माहित होत्या. आणि २-४ वर्षांपूर्वी कधीतरी रेडीओवर ऐकल संपूर्ण गाणं.

कोणी न त्यास घेई खेळावयास संगे
सर्वांहूनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनी बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरुप वेडे पिल्लू तयांत एक

पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरुप वेडे पिल्लू तयांत एक

ही कडवी पहिल्यांदा ऐकल्यावर मी थोडासा उदास, खट्टू झालो होतो आणि अजूनही ऐकताना त्या पिलाविषयी वाईट वाटत...


एके दिनी परंतू पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वार्‍यासवे पळाले
पाण्यात पाहतांना चोरुनियां क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक
 
पण ह्या ओळी ऐकल्यावर एकदम खुश होतो आणि मूड पालटतो! नेहमी हे गाणं ऐकताना माझी अशीच अवस्था होते, शेवटच्या ओळी ऐकल्या की छान वाटत आणि आपोपाप चेहऱ्यावर हसू उमटत :)

मला वाटत गदिमांनी खूप साध्या आणि सरळ शब्दात एक सुरेख विचार सांगितला आहे.
हे गाणं ऐकल्यावर वाटत की सुंदर-कुरूप, शहाणं-वेडं ह्या सर्व कल्पना खूप सापेक्ष आहेत. आपल्यापेक्षा कोणी वेगळ करायला लागल की लोक त्याला
वेडं ठरवून रिकामे होतात!
प्रवाहाच्या विरुद्ध जाणाऱ्याला नेहमीच अवहेलना सोसावी लागते. त्यामुळे आपण बरोबर असलो तरी बाकीच्या लोकांपेक्षा वेगळे आहोत म्हणून आपल्याला वाटत की अरे आपणच चुकीचे आहोत की काय! ('What is right is not always popular and what is popular is not always right.')

पण असा एखादा क्षण येतो त्यावेळी
त्या पिल्लाला स्वतःची खरी ओळख पटते, की खर तर तो एक राजहंस आहे आणि म्हणून तो वेगळा आहे! त्याने आपली पाण्यातली प्रतिमा सुद्धा चोरून क्षणभरासाठीच पाहिलेली असते; कारण सर्वांनी त्याचं इतक खच्चीकरण केलेलं असत की स्वतःकडे बघायची सुद्धा त्याला भीती वाटत असते. त्यामुळे तो self-realization चा क्षण खूप महत्वाचा. आणि ही गोष्ट दुसऱ्या कोणी सांगण्यापेक्षा स्वतःलाच उमजण गरजेचे आहे! कालांतराने जगाला अस्सल काय आहे ते कळते पण ज्यावेळी इतरांच्या हेटाळणीमुळे आपण नाउमेद झालेलो असतो त्यावेळी स्वतःवर विश्वास असणं हे खूप महत्वाचं आहे.

रुढार्थाने हे जरी बालगीत असलं तरी खूप मोठा आशय लाभलाय त्याला; त्यामुळे
बालगीतं ही पोरांसाठी असली तरी हा 'पोरांचा खेळ' मात्र नाही हे पटतं. :) 
 

गायिका: आशा भोसले
संगीतकार: श्रीनिवास खळे
गीतकार: ग. दि. माडगूळकर
 
हे गाणे इथे ऐकू शकता: