Tuesday, January 31, 2012

अग्निपथ च्या निमित्ताने!


(हे लिखाण परीक्षणापेक्षा ह्या निमित्ताने चित्रपटांसंदर्भातचा कोल्हापूरचा नॉस्टाल्जिया आहे)

ह्या वीकेंड ला २ दिवस कोल्हापुरात मुक्काम पडला. शनिवारीच पिक्चरला जावं असा विचार होता पण मित्राचे लग्न असल्यामुळे नाही गेलो. मग तो योग रविवारी रात्री आला.
गावाकडून येतानाच निशांतला फोन करून सांगितलं की थेट 'पद्मा' ला जाऊयात, जेवणाची चिंता नको - वडापाव खाऊ! ;-)
साडेनऊच्या दरम्यान पद्मा चौकात पोचलो(ह्या चौकात ५ चित्रपटगृहे आहेत, आणि सर्व मस्त चालू आहेत.) समोरासमोरच्या दोन थेटरात अग्निपथ लागलेला असून देखील दोन्हीकडे तुडुंब गर्दी! (मला 'पुढारी' मधल्या चित्रपटगृहांच्या जाहिराती आठवल्या - 'वैभवशाली गर्दीचा १२वा आठवडा' :P ) 

त्या गर्दीतून कसाबसा पद्माच्या तिकीट खिडकीला पोचलो तर फक्त स्टॉल आणि फर्स्टची तिकिटे शिल्लक होती. ह्या वर्गाना सीट नंबर हा प्रकार नसल्यामुळे आणि समोरची गर्दी पाहून लक्षात आले की स्टॉल चे तिकीट घेतले तर पडद्यासमोरच बसावे लागेल :)
बाहेर एका ब्लॅकवाल्याकडे 'एक्झीक्युटीव' वर्गाची तिकिटे होती. (हे म्हंजे स्टॉल with सीट नंबर), मी त्याला सव्वाशे वरून ११० वर आणला आणि २ तिकिटे घेतली. खिशात हात घातला तर लक्षात आले ३०-४० रुपयेच आहेत! मग मी त्याला २० रु दिले आणि म्हटलं ही तिकिटे ठेव २ मिनिटात पैसे घेऊन येतो. त्यानंतर तो जे काही म्हणाला त्याने मी असा काही भारावून गेलो की मी २०० ला सुद्धा ते तिकीट घेतलं असत :D तो 'सद्गृहस्थ' म्हणाला, "तिकिटं घेऊन जावा राव, एवढा विश्वास न्हाई व्हय!" आईशप्पथ!............. उडालोच मी! त्या तेवढ्या गर्दीत ११० ची २ तिकिटे तो मला असाच देत होता! मला नाही वाटत पुण्यात मला असा अनुभव आला असता ;-) कोल्हापूर रॉक्स!

घड्याळाचा काटा १० कडे सरकत होता पण आधीचा शो सुटायची काही चिन्हे दिसेनात. मग जोरदार गोंधळ आणि बंद गेटवर धडका! एकदाचे गेट उघडले आणि वाट्टेल तिकडून लोक आत घुसण्याचा प्रयत्न करत होते (स्टॉल ला सीट नंबर नसतो नं). काही बहाद्दर तर पार्किंग मधल्या मोटार-सायकलीवरून उड्या मारत गेले. एखाद्या नवख्या माणसाला वाटावे की दंगल सदृश काहीतरी चालू आहे. पण ते कोल्हापूरकरांचं रेग्युलर शिनेमा-प्रेम आहे. :)
मला वाटतं मल्टीप्लेक्सच्या आधी आणि आता सुद्धा बऱ्याच अंशी चित्रपटांचा गल्ला जमतो तो स्टॉल/फर्स्टच्या पब्लिक मुळेच. एखादा सीन, गाणे, हिरो-हिरोईन यासाठी तोच पिक्चर अनेक वेळा पाहणारे हौशी लोक याच वर्गात असतात. :)

पडद्यावर सेन्सॉरच सर्टिफिकेट आल्यावर बऱ्याच दिवसांनी २० रीळचा चित्रपट बघून बर वाटलं! नाहीतर आजकाल सगळे ८,१०,१४ रीळचे दीड तासाचे पिक्चर म्हणजे उगाच भुर्दंड! फुल्ल ३ तास म्हणजे कसं पैसा वसूल! :D
थोड्या वेळाने 'चुकार' प्रेक्षकांना शोधण्यासाठी येणारा तपासनीस मध्येच येऊन ओळीने तिकिटे तपासून गेला. :)

अॅक्शन पिक्चर पहावा तर कोल्हापुरातच! हृतिक, संजय दत्तच्या एन्ट्रीला तुफान शिट्ट्या. १२ वर्षाचा हिरो पिस्तुल रोखतो त्यावेळी त्याच्यापेक्षा जास्त आवेश प्रेक्षकांमध्येच होता - 'हाण! मार त्याला! सोडू नको' :)
तर सचिन खेडेकर जेव्हा जेव्हा दिसला त्यावेळी 'ए गोट्या...' अशा आरोळ्या(आठवा 'सिंघम'). मग त्यातून हिरो-हिरोईनच्या(नायक-नायिका म्हटल्यावर तो 'फील' येत नाही) प्रणय प्रसंगावर तर एक-से-एक शेरेबाजी! 'ए सोड तिला, आबा कावतोय'... अशा शेलक्या शेऱ्यामधून एखादा भावूक प्रसंग जो इतर वेळी कदाचित बोअर झाला असता, तो पण सुटत नाही! प्रथेप्रमाणे ह्या भावूक प्रसंगावेळचे संथ गाणे कापले गेलेच! 

मग 'चिकनी चमेली' च्या वेळी तर काय उत्साह असेल विचारू नका... पण चिल्लर नाही उधळली राव! बहुधा चार-आठ आणे आजकाल घेत नाहीत त्याचा परिणाम का? :)
पद्माची साउंड सिस्टीम एक नंबर आहे! (आतल्या गोटातली माहिती - JBL चे स्पीकर्स आहेत.) त्यामुळे गाण्यांना तर मजा आलीच पण एवढ्या गोंधळात सुद्धा बहुसंख्य डायलॉग चक्क ऐकू आले!

तर अशा रीतीने एक जिव्हाळ्याचा अनुभव घेऊन रात्री १ च्या दरम्यान बाहेर पडलो. चित्रपट कसाही असो, फुल्ल-टू मजा आली होती. अमाप गर्दी, ब्लॅकने तिकीट, सीट मिळवण्याचा आटापिटा. धुडगुस, शिट्ट्या, शेरेबाजी, अपार उत्साह आणि हो, काटले गेलेले गाणी/सीन्स पण! 

आता थोडेसे चित्रपटाविषयी - बराच वेळ प्रचंड हिंसा दाखवलीय. चित्रपट पटकथेत मार खातो अस वाटलं. नायकाच्या व्यक्तिमत्वासारखाच चित्रपट पण गोंधळल्यासारखा वाटतो. बरेच प्रसंग अतार्किक आहेत. हिरोची जी इमेज आहे त्याप्रमाणे त्याची तत्वनिष्ठा किंवा त्याची हुशारी एखाद्या प्रसंगातच दिसते. इतर वेळी दिसतो तो त्याचा प्रचंड राग(जो समर्थनीय दाखवलाय) पण त्याची वाटचाल तितकी पटत नाही! 
अजय-अतुल ने एकदम कडक संगीत दिल आहे. 'देवा श्रीगणेशा' ह्या गाण्याच्यावेळी मात्र 'मोरया मोरया' या उलाढाल मधल्या गाण्याची आठवण झाली :) ढोल-ताशाचा अप्रतिम वापर मात्र अजय-अतुलच जाणोत! त्यांना दंडवत! :) आम्हा दोघांना पण background score ऐकताना Hans Zimmer ची(पर्यायाने Dark Knight ची) आठवण झाली :) निशांत च्या भाषेत - Hans Zimmer with Indian instruments!

निघताना फक्त एकच हुरहूर होती, ह्या अशा माहौलमध्ये Dirty Picture बघायला काय मजा येईल :P 
शेजारीच 'प्रभात'ला लागला होता पण रात्री उशिराचा शो नसल्यामुळे परत याव लागलं! असो, परत कधीतरी... ;-)