Tuesday, July 21, 2015

लंपन मालिका वाचून संपली!

गेले कित्येक दिवस/महिने बाजूला ठेवत आलेलं 'झुंबर' आज वाचून संपलं. हुरहूर लागणार माहित होती आणि मलपृष्ठ वाचून शेवटच्या कथेत काय असणार याचा अंदाज आला होता पण वाचत असताना वेगळंच काही तरी होत होतं.

'स्पर्श' वाचत असताना सुरुवातीला 'संकेश्वर', 'गडहिंग्लज', 'आजरा' ही ओळखीची आणि जवळची गावे बघून छान वाटत होत, त्यात लंपन च्या आई-बाबांचं गाव बहुधा 'पुणे' असावं असंही सुचित झालं जे आज पर्यंत माझ्यासाठी कोड होत किंवा लक्षात नव्हत आलं . एकंदरीत या कथेचा बाज थोडा वेगळा वाटत होता, आतापर्यंतच्या इतर कथांपेक्षा. (त्याच कारण मलपृष्ठावरच्या निवेदनात आहे.)

मध्येच एका ठिकाणी लंपन च्या वडिलांचा मृत्यू झाला असावा अशी चाहूल देणार वाक्य आलं आणि अपेक्षित असून पण काळजात धस्स झालं… त्यानंतर परत थोडा वेळ लंपन च्या नेहमीच्या शैलीतलं लिखाण.
पण जेव्हा शेवटचे काही परिच्छेद वाचू लागलो, जेव्हा लंपनला समजून चुकत की आपले बाबा परत कधीच येणार नाहीत आणि तो रडू लागतो तेव्हा पासून कथा संपेपर्यंत आणि नंतर १० मिनिटे डोळ्यातील पाणी थांबतच नव्हत.

आपल्या घरातील एखाद्या लहानग्यावर अशी वेळ आल्यावर तो कसा सावरेल असेच वाटत होत. किंवा तो लंपन आपल्याच घरातील आहे किंवा मीच लंपन आहे असल काहीतरी वाटत होत. या लोभस व्यक्तिरेखे मध्ये गेली काही वर्षे अक्षरशः गुरफटून गेलो होतो.


लंपन चे वडील अकाली जाणे, कथामालिकेचा शेवट आणि 'प्रकाश नारायण संत' आपल्यात नसल्यामुळे आता त्यांच साहित्य वाचायला मिळणार नाही या सर्व गोष्टींच दुःख एकत्रित ओघळत होत अस वाटल.
अजूनही त्या अनुभवातून बाहेर आलोय अस वाटत नाही.


आधी ठरवल्याप्रमाणे त्या निरागसपणे ही पुस्तके परत लगेच वाचायला घेईन असे वाटत नाही.

(लोभस व्यक्तिरेखा हा शब्दप्रयोग लंपन च्या बाबतीत पु.लं.नी 'वनवास' च्या प्रतिसादात वापरला आहे, साहजिक तिथून उचलला आहे.) 

Sunday, September 29, 2013

नाना पाटेकर!

Hats off to Nana Patekar. He's such a great person.
सध्याच्या राजकीय/सामाजिक परिस्थिती, अत्याचार इ. यावर सहज भाष्य करताना नाना चे विचार: 

"विषण्ण,नाराज वगैरे मान्य आहे, पण तरीसुद्धा अशी एखादी चुकीची गोष्ट समोर घडत असताना 'मी' म्हणून काय करेन हे महत्वाच आहे. तसं करताना मला त्रास होईल, पण ते मान्य आहे. 
ज्या दिवशी आपण मध्ये पडू आणि प्रतिकार करू तेव्हा असे प्रकार जास्त थांबतील. 

आपण स्वतःवर मर्यादा टाकून घेतल्या आहेत. मुळात आपण जर डोळ्यावर कातडं ओढल असेल तर विषण्ण होण्याचा अधिकार नाही आहे.

*****आपण फार नगण्य असतो ह्यावर विश्वास ठेवला की काहीतरी होता येत!!!!!!!!! *****

चुका नकळत होतात ना मग चांगल्या गोष्टी जाणीवपूर्वक करायला पाहिजेत. 
ज्या दिवशी चांगल काम अनवधानाने 'होऊन' जाईल त्यादिवशी तुम्हाला माफी मागण्याचा अधिकार आहे!

आपल्या भोवतीच्या भिंती तोडल्या की सगळ सोप होईल. धर्म-बिर्म, जात-पात काही नाही.

सगळचं छान होणार आहे आणि ते होत नसेल तर मी त्याच्या साठी प्रयत्न करणार आहे."

ह्या सर्वात आवडल म्हणजे त्यांचा आशावाद. नवीन पिढी हे बदलेल असा विश्वास आहे त्यांना.
आपण सर्व निश्चित हातभार लावूया.
(एकेरी उल्लेख केला, पण त्यांच्या विषयी वाटणाऱ्या आपुलकीपोटीच! :) )

(Reposting from my facebook post for archival)

Friday, July 12, 2013

An experience to remember!



I had a thrilling n kind-of dangerous experience on my visit to ‘Mystery spot’ and ‘17 mile drive’ recently :)

The drive to ‘Mystery spot’ was too good! I later realized that I was driving at 45-50mph(70-80kmph) in the Ghat/Mountain section on the highway :D. The later drive off the highway inside the jungle was very scary :) GPS signals lost and no one around etc.
Also, needless to say – the ’17 mile drive’ is very nice! I missed the sunlight though due to fog. I could get the view, but it must be breathtaking in sunlight :P

I had a superb sea-food dinner in one of the local restaurants near 17-mile drive. The Pacific-Salmon beats Atlantic-Salomon – any time! ;-)
I also tried the oyster :P
(The long wait seemed worth but I had to pay it off later :P)

On my return journey at around 10pm, on a highway(US-101 North), the front-left tire of my rented Corolla suddenly got flat :(
The car was pretty new. If the odometer has to be believed, it had been driven around 350 miles only so far(It looked nice n new too). So was not sure what happened.

It was quite foggy on the road. But fortunately I had good mobile signal, had at least 30% petrol, I was near a town and there was a ‘Exit-sign’ in front of me which helped me to locate myself.

I called Hertz Emergency Road-side assistance which kept me waiting for around 20 mins. I was then told that someone will call me and probably come in an hour or so. I didn’t get a call for long time so was very concerned so as to how long I need to keep the flashers(parking lights) ON and how long my battery/petrol can last.
At around 10:45pm, break-down vehicle came by and the person changed the tire with a temporary one kept in trunk(dickie). The temporary one is real temporary, i.e. its smaller in size compared to others. Hence I had to drive slowly(max 55mph) and need to return the car next day.

I was so relieved when the rescue(!) vehicle came in, coz it was quite lonely though near a town(there was no easy access to the town as highway was guarded by a fence).
Fortunately it was not very cold. Obviously, I couldn’t ask for any other help(apart from calling 911 :) )

You must have figured out that I was all alone during this adventure :P

Now some good part. Next day when I exchanged the car, I am now offered ‘Hyundai Elantra’.
Its also nice car. And I must admit that even with my prejudice towards Korean cars(for unknown reason) – I am impressed with Elantra :)
Its pretty new one.

My initial feeling towards couple of cars I could drove was that Corolla’s steering is very smooth and I liked it. Kia’s(Soul) hard steering was painful for me especially on long travel.

Elantra steering is also harder compared to Corolla, but I find it more stable on highway!

Having praised Hyundai a lot, Mr. Manish – let me tell you that I wont get i20 though :P
Its too much for me ;-)

P.S. I just realized that I had started this as an email to tell about Elantra(Hyundai), but turned out to be more experience telling and also quite lengthy :P
Hence putting on a blog :D

(This calls for a picture)
Lone Cypress as they call it, on 17-mile drive.
Blame me n the mobile camera for poor picture quality :)
 

Saturday, January 19, 2013

कर्नाटक मंदिर भ्रमंती(हळेबीड-बेलूर-शृंगेरी इ.)

This is more of travelogue than blog - this is on special demand by Ajay :)

मंदिर भ्रमंतीच म्हटली पाहिजे कारण आमच्या वास्तुविशारद परम मित्रांनी आखलेल्या ह्या ट्रीपमध्ये बहुसंख्य देवळांचा समावेश होता; तरी मी नाराजी दर्शवल्यामुळे शेवटी आटोपते घ्यावे लागले. :)

२७ डिसेंबरला सकाळी आम्ही निघालो NH4 ने दावणगिरीच्या दिशेने. थेट रानीबेन्नुरला थांबलो जेवणासाठी, तोपर्यंत ३ वाजून गेले होते. मेन रोडवरच स्टॅंडच्या पुढे डाव्या बाजूला छोटीशी खानावळ आहे - 'बसवेश्वर खानावळी'. ज्वारीची भाकरी आता इथून पुढे ४-५ दिवस मिळणार नाही याची कल्पना असल्याने २ घास जास्तच गेले! :)

इथून पुढे आमच्याकडे होता तो मित्राच्या वडिलांनी आखून दिलेला मार्ग आणि कर्नाटकचा नकाशा(कागदावरील, online नव्हे)! बहुसंख्य प्रवास याच्या आधारानेच केला.

पुढे हरिहरला जाण्याचा प्लॅन होता पण उशीर झाल्यामुळे कॅन्सल करावा लागला. थोड्या वेळाने दावणगिरी नंतर हायवे सोडून संतेबेन्नूर साठी उजवीकडे वळलो, पण चुकीचा रस्ता घेतला आम्ही; हा शॉर्टकट होता पण रस्ता पूर्णपणे खराब. याच्या थोडे पुढे एक state highway दिसत होता नकाशात, पण परत जाणे सुद्धा शक्य नव्हते. संतेबेन्नूर ला कसेबसे पोचलो तेव्हा साडेपाच होऊन गेले होते. आता इथून पुढे चन्नगिरी(Channagiri) ला जायचा रस्ता शोधत असताना डावीकडे काहीतरी पुरातन वास्तू दिसली आणि सगळे खुश झालो. तिथे गेल्यावर त्या रम्य संध्याकाळी पुष्करणीचा सुंदर देखावा बघून एकदम प्रसन्न झालो :)





काही स्थानिक लोक सोडले तर विशेष कोणी नव्हते त्यामुळे एकदम निवांतपणे फिरता आले. जवळची वास्तू म्हणजे मुसाफिरखाना आहे अस कळल. त्याच्या गच्चीवर जाऊन छान view मिळाला.

खूप वेळ रेंगाळत होतो पण बरंच अंतर जायचं असल्याने लगेच निघालो. इथून पुढे एक खूप चांगले लक्ष्मी-रंगनाथ मंदिर आहे असे कळले म्हणून गेलो पण निराशा झाली. तोपर्यंत अंधार पडलाच होता तरी सुद्धा शहाजी महाराजांच्या समाधीला भेट देण्यासाठी होदिगेरे(Hodigere) गावाचा शोध घेतला. अपेक्षेप्रमाणे हे स्मारक देखील तसे दुर्लक्षित होते. 
तिथून निघालो Channagiri मार्गे भद्रावतीला पहिल्या मुक्कामासाठी. Channagiri नंतर नकाशात जवळचा मार्ग दिसला म्हणून लगेच डावीकडे वळलो,पण नंतर लक्षात आले की शिमोगा मार्गे गेलो असतो तर पूर्ण हायवे होता, रस्ता चांगला असेल. मधला रस्ता बराच खराब होता. पण वाटेत एका तलावाच्या काठाला चंद्र आकाशात आला असतानाचा झकास देखावा मात्र हायवेला मिळाला नसता! 

पोचेपर्यंत ९ वाजत आले होते, थोड्या चौकशी नंतर 'पवन लॉज' मध्ये राहायचे ठरले. Descent आहे शहराच्या मानाने :) त्याच्या बाहेरच मेन रोड वर पद्म-निलय नावाचे हॉटेल आहे जिथे रात्री जेवलो आणि सकाळी नाश्ता पण केला. इथला प्लेन केक मस्तच होता! नंतर सुद्धा आठवण निघत होती सारखी!

दुसऱ्या दिवशी सकाळी Tarikere च्या अलीकडे बेंगलोर हायवेला 'Bhadra Wildlife Sanctuary and Dam' चा बोर्ड दिसला म्हणून आत शिरलो. तिथल्या ऑफिस मधून कळले की सकाळी ६ आणि संध्याकाळी ४ वाजता जंगल सफारी असते आणि नशीब जोरावर असेल तर वाघोबाचे दर्शन पण होते :) गवे पण असावेत जंगलात.

आता आलोच आहे इकडे तर जरा चक्कर मारावी म्हणून dam च्या दिशेने गेलो तर कळले की इकडे एक resort आहे. जाऊन बघितले तर अगदी धरणाच्या काठाला लागून ते resort आहे. इथला ambiance, view एक नंबर आहे!
 इथल्या जवळपास सगळ्या कॉटेज रूम मधून जलाशयाचा सुंदर view आहे! :)

ह्यांच्याकडे  १-२ दिवसाचे जंगल सफारीसह पॅकेज उपलब्ध आहे आणि resort एकदम छान आहे.. एकदम निवांत कोलाहला पासून दूर असे ठिकाण असल्यामुळे २ दिवस मस्त राहायला यावे असे वाटते! पण थोडे महाग वाटले.
अधिक माहितीसाठी ही लिंक बघा www.riverternlodge.com

इथून निघालो अमृतपुरा(Amruthapura) येथील अमृतेश्वर मंदिर पाहायला. होयसाळ शैलीतील हे मंदिर आहे बहुधा. विकी वर माहिती आहे. खूप छान मंदिर आहे. इकडे आवर्जून जाणवलेली गोष्ट म्हणजे या सर्व ठिकाणांना पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक घोषित केल्यामुळे त्यांची एकदम नीट काळजी घेतली जाते.
इथून पुढे एक से एक मंदिरांच्या कारागिरीचे नमुने बघायला मिळत होते! इतके नाजूक आणि सुबक काम तेही इतक्या तपशीलासह एका सलग दगडात पाहून विश्वासच बसत नव्हता! इथल्या कारागिरीचे वर्णन शब्दात करणे अशक्यच आहे!
बारीक सारीक तपशील आणि symmetry बघून नुसते अवाक झालो!

छतावर एके ठिकाणी नटराजाची मूर्ती आहे. खूप अंधार असल्यामुळे नीट फोटो घेता आला नाही. (SLR ची गरज सारखी वाटत होती :) )
त्यानंतर आम्ही निघालो हळेबीड-बेलूरच्या दिशेने. हळेबीडच्या आधी Belavadi साठी एक फाटा लागला, थोडेसे आत जावे लागते पण नृसिंह मंदिर खूप छान आहे.


मला वाटते कृष्णाची इतकी सुंदर मूर्ती मी अजून पाहिली नाही आहे :)


                                      कोरीव काम तर सुंदर होतेच :)

ह्या मंदिरात आमच्याशिवाय कोणीच भाविक/पर्यटक नव्हते त्यामुळे शांतपणे बघता आले आणि पुजाऱ्याने सर्व माहिती पण नीट सांगितली.
सगळ्यात जास्त आवडलेले मंदिर!!! :)

त्यानंतर निघालो आम्ही हळेबिडू(अलीकडे बऱ्याच गावाना 'ऊ' प्रत्यय लागलाय कर्नाटकात) कडे. इथल्या जगप्रसिद्ध मंदिरात प्रचंड गर्दी होती, मोठ्ठ्या संख्येने शाळांच्या सहली पण होत्या.


 
अतिशय सुंदर मंदिर आणि खूप कोरीव काम असल्यामुळे गाईड घेणे अगदी आवश्यक आहे. २०० रु. घेतले आणि हिंदी मध्ये मंदिर तसेच महत्वाच्या शिल्पांविषयी माहिती दिली. पुढील माहिती गाईड ने दिल्या नुसार:
ह्या गावाचे मूळ नाव काहीतरी वेगळे होते, पण हे मंदिर बांधताना आणि नंतर खूप हल्ले झालेत त्यामुळे ह्याचे नाव हळेबिडू पडले, ज्याचा अर्थ 'भग्न गाव/जागा' असा आहे. अनेक हल्ल्यांमुळे बऱ्याचशा मूर्ती/शिल्पे विद्रूप केली आहेत :( आणि त्यामुळेच हे मंदिर पूर्ण होऊ शकले नाही. १०० हून अधिक वर्षे लागलीत आता जे मंदिर आहे ते बनायला.



होयसाळ घराण्याने हे शिवाचे मंदिर बांधले आहे त्यामुळे २ मोठ्ठ्या नंदीच्या मूर्त्या पण आहेत.
ह्या मंदिराची विशेषता की इथले बाहेरचे कोरीव काम खूप सुंदर आहे आणि रामायण-महाभारत इ. मधील प्रसंग इथे उतरवले आहेत. इथल्या शिल्पांमधील तपशील बघून थक्क व्हायला होत! हा दगड 'soap stone' आहे,जो सुरुवातीला मऊ असतो आणि नंतर उन-पावसामुळे कठीण होतो.
वरती जे डमरू दिसतंय त्याच्या वाद्या(strings) पण अगदी त्याच्या ताणासाहित दिसतात!

ह्या खालच्या शिल्पात कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आहे तो प्रसंग इतक्या तपशीलात आहे की त्या पर्वतावरील एक झाडावरच्या माकडाच्या हातात पाहीतरी फळ आहे ते पण दिसते! हे आणि असे अनेक चमत्कार बघून फक्त निःशब्द व्हायचं!



 ह्या नर्तकीचे तळपाय सुद्धा इतक्या तपशीलात आहेत की तिच्या नृत्यमुद्रेप्रमाणे पायाची ठेवण दाखवली आहे.

इथे राहण्याची सोय चांगली नाही अस कळल्यामुळे १५ किमीवर असलेल्या बेलुरला मुक्कामासाठी जायचं ठरवलं. संध्याकाळी पोचलो आहेच तर एक चक्कर टाकू आणि शक्यतो आज रात्रीच इथून निघू असा बेत होता. हे विष्णूचे मंदिर आहे आणि बहुधा होयसाळ घराण्याचे कुलदैवत आहे. हळेबीडच्या मंदिराशी शैलीत खूप साधर्म्य आणि साधारण एकाच कालखंडात बांधलय. हे मंदिर पूर्ण असल्यामुळे इथे पूजा-अर्चा चालू असते. आम्ही पोचलो तेव्हा मंदिरात सॅक्सॉफोन आणि Thavil वादन चालू होते! त्या धीरगंभीर वातावरणात इतकं भारी वाटत होत की सगळेजण एकदम trans मध्ये गेलो! त्यानंतर २ लहान मुलींचे भरतनाट्यम म्हणजे तर पर्वणीच होती. :) अविस्मरणीय संध्याकाळ होती!

राहण्यासाठी बऱ्याच लोकांनी सुचवलेले ठिकाण म्हणून Vishnu Regency शोधत गेलो पण इतके काही आवडले नाही. त्यामुळे Maurya(KSTDC approved) हॉटेल शोधले. सुविधा चांगल्या आहेत, पार्किंगचा प्रश्न नाही, पण इथल्या स्टाफला service हा शब्द माहीत नसावा! :) जेवण काही खास नव्हते.
सकाळी उठून मंदिरात जाण्याआधी एका छोट्या हॉटेल मध्ये भरपेट नाश्ता करून घेतला! काय काय ऑर्डर केलं होत काय माहीत! पण इकडे सगळीकडे डोसा, इडली-वडे खूप भारी होते. अशी कॉफी तर आपल्याकडे मिळणे अशक्य आहे(ह्या हॉटेल मधल्या कॉफीची झक्कास किक बसली होती). जेवण इतकं नाही आवडत पण. इकडच्या सोनकेळ्याना एकदम भारी चव होती, आम्ही तर त्यांना पेरू-केळीच म्हणायचो! :P
 
बेलूरच्या मंदिरासाठी गाईड घेतला आणि त्याने बरेच तपशील सांगितले जे आपल्या एरवी लक्षात येणे अवघड आहे. ह्या मंदिरात आतील कलाकुसर खूप छान आहे. एका नर्तकीच्या हातातील बांगडी गोल फिरवता येते म्हणे! 

काल जिथे गायन/नृत्य चालू होते त्या जागी एक सर्चलाईट लावला होता छतावरची कलाकुसर दाखवण्यासाठी!(त्याचे २० रु. वेगळे बर का :) ). इतकं बारीक नक्षीकाम बघून किती अवाक व्हायचं अस वाटत होत! 

खूप वेळ पाय निघत नव्हता खर तर इथून! 

नंतर आम्ही Mudigere मार्गे Kalasa(उच्चार 'कळसा' बहुधा) ला निघालो. अण्णांनी सांगितल्याप्रमाणे इथून पुढचा प्रवासच बघण्यासारखा आहे! :) आणि थोड्याच वेळात ह्याचा अनुभव येऊ लागला. अचानक रुक्ष वातावरण बदललं आणि सगळीकडे झाडी दिसू लागली. वळणावळणाच्या रस्त्यातून जाताना थोड्या वेळाने कळल की कॉफीचे मळे आहेत दोन्ही बाजूस. मध्ये गाडी थांबवून एकदा बघून याव कसं दिसत कॉफीचं झाड म्हणून एक चक्कर मारून आलो! दुपारची वेळ होती आणि नुसती कॉफीची फळं बघून तहान-भूक भागत नव्हती, अशात आम्हाला 'कॉफी कॉर्नर' असा एक बोर्ड दिसला आणि ५-६ किमी नंतर एक छोटेसे टपरीवजा हॉटेल लागले. बहुधा हॉटेल-मॅनेजमेंट केलेला कोणीतरी उत्साही मुलगा असावा, त्याने कॉफी मळ्याच्या शेजारीच स्नॅक्स, कॉफी इ. साठी ते चालू केलय. छान view आहे आणि कोल्ड कॉफी तर लाजवाब होती(दुर्गा प्रेमींनी म्हणावं - याला म्हणतात कोल्ड कॉफी :D) कांदाभजी पण मिळाल्या! 
इथूनच थोडे पुढे 'Kelagur Coffee and Tea Estate' मध्ये स्थानिक मळ्यातील चहा-कॉफी इ. गोष्टी मिळतात. (घरी आणलीय कॉफी, चांगली वाटतेय :) )
आम्हाला Kalasa इथे पोचायला दुपार उलटून गेली होती. इथले मंदिर लाकडी आहे. 

आजूबाजूचा परिसर पण एकदम नयनरम्य आहे! सगळ्यांना विशेष वाटत होत की ह्या भागातली
घरे एवढी maintained कशी काय आहेत! एकदम छान आणि टुमदार:)

४:३० च्या दरम्यान त्या छोट्या गावात एक खानावळ वजा हॉटेल शोधले. जागा बघून इथे काहीच खायला नको अस वाटलं होत सुरुवातीला पण जेवण एकदम आवडल. चपात्या तर घरच्यासारख्या होत्या!

साधारण १० किमी वर होर्नाडू(Hornadu) इथे 'अन्नपूर्णेश्वरी मंदिर' आहे. रस्ता अतिशय खराब आहे. पण इकडे जायचेच असल्याने काही सुटका नव्हती :P 
अगदी आडमार्गी असले तरी राहण्यासाठी बऱ्याच सोयी दिसल्या. खूप लांबून भाविक येतात असे दिसत होते, पण आम्हाला काही खूप इंटरेस्ट नव्हता. :)

इथला मंदिराचा फोटो मात्र काढायचा राहिला.

इथून जायचे होते शृंगेरीला मुक्कामासाठी. अंतर तसे बरेच होते आणि घाटांचा रस्ता असल्यामुळे चौकशी केली आणि कळले की Balehonnur वरुन रस्ता बरा आहे. शृंगेरीला पोचेपर्यंत रात्र झाली होती. गावाबाहेरच एक मोठ्ठे हॉटेल आहे पण ते फुल्ल असल्यामुळे गावात चौकशी करत समजले की मठ/मंदिराच्या अगदी समोर भक्त निवास मध्ये चांगली सोय आहे, अगदी माफक दरात.

इथे पुरातनकालीन सरस्वती मंदिर आहे आणि अजून पण बरीच मंदिरे आहेत. त्याबरोबरच सर्वात महत्वाचे म्हणजे शंकराचार्य मठ आहे. 

इथे खूप सारे पालक आपल्या लहान मुलांना 'श्रीगणेशा' करण्यासाठी पाटी-पेन्सिल घेऊन आले होते. 
हे मंदिर नदीच्या काठावरच आहे आणि पलीकडे मठ आहे. चालत जाण्यासाठी पूल आहे, त्याच्या शेजारी लोक माशांना खायला घालत असतात त्यामुळे इथले मासे एकदम मोठे झाले आहेत! :)
 पलीकडे एकदम निसर्गरम्य वातावरणात गुरु-निवास आणि बरेच काही आहे.


मग निघालो आम्ही अगुंबे(Agumbe) घाटाकडे, इथून हवा स्वच्छ असेल तर कोकणचा देखावा दिसतो म्हणे! थोडा वेळ टाईमपास करून आम्हाला जायचे होते Thirthahalli मार्गे हुमचा(Humcha) येथील पुरातनकालीन जैन मंदिर बघायला. मुख्य मंदिर बहुधा नवीन आहे, पण थोड्या अंतरावर संरक्षित स्मारक असलेले जुने मंदिर आहे.
बरीच पडझड झाली होती पण परत restore करायचा प्रयत्न केलाय.


इथून निघालो 'सागर' जवळ 'Ikkeri' इथे. हे पण मंदिर पुरातनकालीन आहे.  


खरे तर इथपर्यंत माझा मंदिर बघण्याचा स्टॅमिना संपला होता त्यामुळे बनवासी(कदंब घराण्याची राजधानी) वगैरे ठिकाणांना जाण्याचा बेत रहित केला आणि जोग फॉल्सच्या जवळूनच हाय-वे ने कोकणात उतरलो, होनावरला. तिथून ३०किमी दक्षिणेला किनारपट्टीवरच मुर्डेश्वर आहे. तिथे मुक्कामासाठी गेलो.
घाट उतरल्या नंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली म्हणजे बेलूर-शृंगेरी साईडला खूप छान वाटत होते, आणि वेगळाच भाग वाटत होता. पण खाली किनारपट्टीला आल्यावर नेहमीची बजबजपुरी वाटू लागली!
मुर्डेश्वर मध्ये ३० डिसेंबरला राहायला मिळणे अवघड वाटत होते, पण सुदैवाने RNS residency(जे मंदिराला अगदी लागून, sea view असणारं भारी हॉटेल आहे) मध्ये सहाव्या मजल्यावर मस्त रूम मिळाली!
खूप प्रसिद्ध जागा आहे! इथे सगळ भव्य दिव्य आहे :) प्रचंड मोठ्ठी शंकराची मूर्ती, खूप उंच गोपुरम इ. 
गोपुरम मध्ये लिफ्ट ने जायचं असल्यास दुपारी ३ नंतर सोडतात अस ऐकल.


मुर्डेश्वर मध्ये अजून एक गोष्ट जाणवली म्हणजे इथे सबकुछ RNS आहे. कोणीतरी RN Shetty नावाचा बडा माणूस दिसतोय!

इथून निघालो आम्ही परत होनावर मार्गे गोकर्णच्या दिशेने. ४ पर्यंत पोचलो होतो, मग ओम बीच कडे जाण्याचा विचार आला(तिकडची काही रिसॉर्टस् चांगली आहेत अस ऐकल्यामुळे).
३१ डिसेंबर असल्यामुळे सगळी रिसॉर्टस् फुल्ल होती. मग असंच अगदी आतल्या बाजूला असलेले
रिसॉर्टस् शोधताना अंजनेय जन्मस्थाना जवळ एक भारी स्पॉट सापडला! सूर्यास्ताची वेळ असल्यामुळे एकदम मस्त देखावा होता.
खूप छान हवा असल्यामुळे इथून पाय निघत नव्हता खर तर! 

आम्हाला  दमदार साथ दिलेल्या चौगुलेंच्या गाडीचा फोटो तर निघायलाच पाहिजे होता :)
इथे मागे काही गाड्या वगैरे दिसत आहेत तिथे एक कॅफे आहे. बराच वेळा क्षुधाशांती झाली नसल्यामुळे किमान कॉफी तरी मिळतेय का बघण्यासाठी गेल्यावर कळलं की तो कॅफे जर्मन लोकांनी चालवलाय आणि भारतीयांना अप्रत्यक्षरीत्या प्रवेश निषिद्ध आहे. आम्ही चौकशी केल्यावर अतिशय सभ्य शब्दात काहीतरी बहाणे बनवून indirectly सांगितलं की Indians are not welcome! ह्या भागात खूप युरोपियन/रशियन लोक दिसत होते आणि साहजिकच त्यांच्यासाठीची रिसॉर्टस्, कॅफे इ. 
भारतातल्याच एका भागात भारतीयांना प्रवेश नाकारला जातोय हे बघून अतिशय सुन्न झालो. गोकर्ण/ओम बीच चं मोर्जी(Morjim-Goa) होतंय, किंबहुना झालेच आहे अस वाटत होत.  
मग रात्री ८ च्या दरम्यान परत गोकर्ण गावात आलो. ३१ डिसेंबर मुळे धास्ती होती, पण थोड्याच प्रयत्नात रूम मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी गोकर्ण बीच वर गेलो पण एकदम निराशा झाली. लोकांनी वाट लावून टाकली आहे बीचवर. अतिशय अस्वच्छ आहे.
नंतर इथल्या मंदिरात बाहेरूनच दर्शन घेतले! अंगारकी असल्यामुळे प्रचंड गर्दी होती.

मग दुपारी परतीच्या प्रवासाला लागलो. रात्रीपर्यंत कोल्हापूरला पोचायचे होते. जेवणासाठी अंकोल्याच्या अलीकडे हायवे वर इंडियन ऑईलच्या पंपावर कामत रेस्टॉरंट आहे, तिथे थांबलो. जेवण छान आहे. इतके दिवस दाक्षिणात्य खाल्ल्यावर पंजाबी थाळी चा मोह आवरला नाही आणि खरंच चांगली मिळाली थाळी.

नंतर मग यल्लापूर मार्गे थेट हुबळी जवळ NH4 वर आलो. मधून काही शॉर्टकट आहेत पण हा रस्ता एकदम चांगला आहे.

बेळगावच्या आसपास सूर्यास्त होताना ढगाआड सूर्य लपला होता.

कलत्या सूर्यासोबत आम्ही पण परत निघालो होतो घरी, पुन्हा कधी अशीच भारी ट्रीप करायची या विचारात! :)

आम्ही  घेतलेला मार्ग इथे पहा. १-२ ठिकाणी नकाशा मध्ये शॉर्टकट दाखवला आहे पण शक्यतो मुख्य रस्ता/हायवे घेणे श्रेयस्कर.

Monday, September 10, 2012

राजांचा गड, गडांचा राजा!


बरेच दिवस काही लिहील नव्हत मध्ये १-२ वेळा वाटलं होत पण परत म्हटलं त्या पद्धतीच आधी लिहून झालंय त्यामुळे टाळल :) (TDKR@IMAX, आंबोली इ.)

कुठून डोक्यात आलं होत काय माहित पण राजगडला जावं अस शुक्रवारी वाटलं. कदाचित आंबोली भ्रमंती नंतर पावसाळी ट्रेकची इच्छा अपुरीच राहिली होती. जळगावच्या पाटलांनी उत्साह दाखवला म्हणून शिराळ्याच्या पाटलांकडून माहितीची विचारणा केली. दोघांनीही पाटीलकीला स्मरून ऐन वेळी ठेंगा दाखवला :D
तरीपण जुजबी माहिती मिळाली होती आणि मग मिपा/नेट वर बघितलं तर चिक्कार माहिती होती, ती वाचून तर जायची इच्छा प्रबळ झाली!
सकाळी उठून पण तळ्यात-मळ्यातच होत. शेवटी २ पराठे घेतले बांधून आणि म्हटलं एकटा तर एकटा निघू! ह्या अगोदर गेलो नसलो तरी परमुलुखात स्वारीला थोडेच जायचं होत, आणि नदी पार करायला पूल पण होता, यवनांसारखे अडथळे नव्हते पार करायचे! मग शेवटी १० वाजता किक मारली!(अरे हो, गाडीची बॅटरी बदलायची आहे बरेच दिवस :P)

खेड-शिवापूर च्या लूट-नाक्या(spelling mistake झाली वाटत :P) पर्यंत छान रेहमान ऐकत बऱ्याच दिवसांनी मस्त गाडी चालवायला मिळाली पण तिथे पाऊस आला आणि लक्षात आले, घात झाला! बहुधा पूर्ण दिवस ओलेत्याने जाणार. रस्ता विचारत, राजेंचे वारसदार नव्हे (स्वयंघोषित) राजेच जणू आणि त्यांचे खंदे समर्थक यांच्या बेलगाम ड्रायव्हिंग पासून सांभाळत वेल्हा रस्त्याने गुंजवणे या पायथ्याच्या गावी पोचलो. त्याच्या थोडंस आधी एक अप्रतिम नजारा होता! समोरच राजगड आहे हे माहित नव्हत आणि धुक्यामुळे लक्षात पण आलं नाही. नागमोडी रस्ता, सगळीकडे पसरलेली हिरवाई, धुक्यात हरवलेले डोंगर आणि मधून वाहणारी नदी! वाह... ७० किमी आल्याचं सार्थक वाटत होत, मग पुढे जे काही असेल ते तर बोनस :)

१२ वाजण्याच्या सुमारास गाडी लावल्यानंतर एक चहा ढकलला आणि रस्ता शोधत असताना खोचीकर पाटलांचा एक मित्र दिसल्यासारखे वाटले म्हणून बघितलं तर एक मराठमोळा ग्रुप होता. ते पण पहिल्यांदाच निघाले होते आणि जेवणाची सोय लावत होते. त्यांना विचारलं परत येणार ना संध्याकाळी, तर त्यांचा विचार होता! म्हटलं बघू येताना पण आता ह्यांच्या सोबतच निघू. तिथल्या हॉटेल मध्ये गडावरच्या असंख्य मावळ्यांच्या क्षुधाशांतीच काम असल्यामुळे त्यांनी बराच वेळ घेतला आणि मग १२:३० च्या दरम्यान निघालो. थोड्याच वेळात पावसाने पुन्हा हजेरी लावली. जर्किन घालावं तर गरम होत नाहीतर पाऊस कोसळतोय! अधिक महिन्यामुळे पावसाला पण confuse झाल होत त्यामुळे कधी मोठी सर यायची तर कधी श्रावणासारख्या हलक्या सरी आणि कधी उघडीप! थोड्या वेळाने कळेना की घामाने भिजलोय की पावसाने आणि नंतर तर पावसाचे काहीच वाटेना झाले! :)
 
चिखलातून वाट काढत असताना लक्षात आले होते की जगप्रसिद्ध Woodland shoes चा काही उपयोग नाही! ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी गत झाली होती! :)
आता हळू हळू ग्रुपमधल्या इतरांशी चांगल्या गप्पा चालू होत्या, असल्या अतरंगी मोहिमेचा म्होरक्या कोण यावरून कौतुकसोहळा चालू होता आणि पुन्हा असल काही न करण्याचा निश्चय निम्म्या वाटेत पोचायच्या आधी झाला होता :)
खालच्या गावातून गडावर जेवण पोचवणारे एक मामा आम्हाला एकदा म्हणाले अजून १५ मिनिटे आहे, आणि पुढच्या १५ मिनिटात ते मधून परत आले वर जाण्यासाठी तर म्हणाले हे काय १५ मिनिटावर. आणि त्यानंतर अर्ध्या तासानी आम्ही पोचलो... तरीपण त्यांनी सांगितलेल्या दीड तासाच्या अंदाजापेक्षा १५ मिनिटेच जास्त घेतली आम्ही :)
बहुंताश वाट खूप चढणीची नाही आणि ऊन नाही त्यामुळे वेळ लागत असला तरी अजून धीर सुटला नव्हता. चोर दरवाज्याचा शेवटचा टप्पा थोडा चढणीचा आहे अस ऐकल होत आणि मग बघितल्यावर कळलं की तो ‘थोडा’सा अवघड रेलिंग मुळे झालाय. नाहीतर आम्हाला अशक्यच होता! दगडांमधल्या खोबनीला पायरी म्हणायचे आणि एकावेळी एक माणूस जाऊ शकेल अशा रीतीने रेलिंगला पकडून वार सरकायचे. तो पार केल्यावर समोर येतो तो ‘चोर’ दरवाजाच! आणि त्यात नावाप्रमाणे एकदम वाकून जावं लागत. इथे पोचल्यावर सगळे एकदम खुश झालो कारण बऱ्यापैकी वेळेत पोचलो होतो. पायऱ्यांनी थोड वर आल्यावर तटबंदी दिसतानाच बहुधा तळ आहे अस वाटलं. त्याच्या कडेन जाताना धुक्यामुळे नीट नव्हत दिसत; पाउस तर एकदम दिमाखात कोसळत होता आणि एकदम लोभसवाणा वाटत होता. अजून वरती गेल्यावर पर्यटक निवासासमोर उभ राहिल्यावर पद्मावती तळ्याचा विस्तार बघून वाटलं की एवढ्या वरती अस तळ म्हणजे चमत्कारच आहे!
पोचेस्तोवर कसाबसा कड काढला होता त्यामुळे आधी पेटपूजा क्रमप्राप्त होती! पद्मावती मंदिर, रामेश्वर मंदिर एकदम भरलेले होते, त्यामुळे पर्यटक निवासाच्या व्हरांड्यात उभं राहून केलेल्या जेवणाची लज्जत वाढवली ती गडावर मिळालेल्या घट्ट दह्याने! पागोळ्यांच्या पाण्याने हात धुवून मंदिरात जागा मिळते का बघितली सॅक ठेवण्यासाठी. पण लक्षात आलं की इथली मंदिरं एकतर प्रोफेशनल ग्रुप्स किंवा राजगड सारख्या पवित्र ठिकाणी वेगळीच ‘नशा’ अनुभवण्यास आलेल्यांनी स्थानिक लोकांना हाताशी धरून काबीज केली होती.

वेळ कमी असल्यामुळे सगळा किल्ला बघून होणे शक्यच नव्हते. त्यामुळे ‘प्रमुख आकर्षण’ असलेला ‘भव्य’ बालेकिल्ला तरी बघून घ्यावा अस ठरलं. तिघेजणच तयार झालो. गडावरचे उरलेले अवशेष बघत निघालो होतो. भन्नाट वारा, मस्त धुक ह्यामध्ये काही दऱ्यांमध्ये फेकलेला प्लास्टिक/थर्मोकोल चा कचरा टोचणी लावत होता...



थोडा वेळ चालल्यानंतर मग सुरु झाली खरी परीक्षा! आधीच्या पेक्षा खडा चढ! एक गोष्ट चांगली होती म्हणजे धुक्यामुळे उंचीचा काही अंदाज येत नव्हता नाहीतर काही खरे नव्हते :) त्या एवढ्याश्या वाटेतून पाणी वाहत होते आणि नंतर तर रेलिंग चा पण आधार नव्हता एका ठिकाणी! एकदम रोमांचकारी अनुभव होता! वेळ अपुरा असल्यामुळे इथूनच परताव का असा विचार चालू होता. तरीपण थोड पुढे जाऊन बघितलं आणि बुरुज, दरवाजा दिसला! मग उरलेलं अंतर झटक्यात पार केलं आणि खरंच गड सर केल्याचा खूपच आनंद झाला! वाटत नव्हत की इथेपर्यंत पोचू म्हणून 8-)

ह्या दरवाज्यापासून अजून वरती गेल्यावर एक तळ आणि मंदिर आहे. तळ्याच्या गार पाण्याने तोंड धुतल्यावर सगळा शीण निघून गेला! धुक्यामुळे काहीच दिसत नव्हत नाहीतर इकडून खूप भारी दृश्य दिसेल अस वाटत. काही हरकत नाही, Trial run झाला आता! परत येणे होईलच तेव्हा बघू सर्व नीट!
आता परतीच्या वाटेवर कळू लागले की ‘उतरणे अवघड’ का आहे आणि विशेषतः पावसात! मघाशी जिथून चढून आलो होतो त्या पायऱ्या(?) बघून विश्वास बसत नव्हता की आपण चढून आलोय हे! आणि इथून कसेबसे उतरल्यावर confidence आला की आता खालच्या वाटेची चिंता नाही!


त्या मस्त धुंद, गूढ वातावरणाचा आनंद घेत चहा घेतला आणि खाली निघालो. विशेष म्हणजे एकदा पण कुठे धडपडलो नाही. पण चढायला लागला तितकाच वेळ लागला!
आता कधी एकदा घरी पोचतोय असे झाले होते. भिजलेले शूज, सॉक्समुळे माझे पाय पहिल्यांदा एवढे गोरे(!) दिसत होते :D

हायवेला पोचेपर्यंत अंधार पडला होता आणि वरुणराजा घरापर्यंत पोचवायला येणार असे दिसत होते! रात्रीची वेळ आणि पाउस म्हणजे आम्हा चार-डोळे वाल्यांसाठी ‘आधीच मर्कट, त्यात मद्य प्यायला’ अशी अवस्था! त्यात ठिकठिकाणचे खड्डे, रस्त्यावर आलेली माती यामुळे पुरती वाट लागली वाकडला पोचे पर्यंत.
सगळ अंग दुखत होत, पायांची आग होत होती पण डोक्यात विचार चालू होता – हिवाळ्यात परत कधी जायचं, राजांच्या गडावर! :)