Tuesday, July 21, 2015

लंपन मालिका वाचून संपली!

गेले कित्येक दिवस/महिने बाजूला ठेवत आलेलं 'झुंबर' आज वाचून संपलं. हुरहूर लागणार माहित होती आणि मलपृष्ठ वाचून शेवटच्या कथेत काय असणार याचा अंदाज आला होता पण वाचत असताना वेगळंच काही तरी होत होतं.

'स्पर्श' वाचत असताना सुरुवातीला 'संकेश्वर', 'गडहिंग्लज', 'आजरा' ही ओळखीची आणि जवळची गावे बघून छान वाटत होत, त्यात लंपन च्या आई-बाबांचं गाव बहुधा 'पुणे' असावं असंही सुचित झालं जे आज पर्यंत माझ्यासाठी कोड होत किंवा लक्षात नव्हत आलं . एकंदरीत या कथेचा बाज थोडा वेगळा वाटत होता, आतापर्यंतच्या इतर कथांपेक्षा. (त्याच कारण मलपृष्ठावरच्या निवेदनात आहे.)

मध्येच एका ठिकाणी लंपन च्या वडिलांचा मृत्यू झाला असावा अशी चाहूल देणार वाक्य आलं आणि अपेक्षित असून पण काळजात धस्स झालं… त्यानंतर परत थोडा वेळ लंपन च्या नेहमीच्या शैलीतलं लिखाण.
पण जेव्हा शेवटचे काही परिच्छेद वाचू लागलो, जेव्हा लंपनला समजून चुकत की आपले बाबा परत कधीच येणार नाहीत आणि तो रडू लागतो तेव्हा पासून कथा संपेपर्यंत आणि नंतर १० मिनिटे डोळ्यातील पाणी थांबतच नव्हत.

आपल्या घरातील एखाद्या लहानग्यावर अशी वेळ आल्यावर तो कसा सावरेल असेच वाटत होत. किंवा तो लंपन आपल्याच घरातील आहे किंवा मीच लंपन आहे असल काहीतरी वाटत होत. या लोभस व्यक्तिरेखे मध्ये गेली काही वर्षे अक्षरशः गुरफटून गेलो होतो.


लंपन चे वडील अकाली जाणे, कथामालिकेचा शेवट आणि 'प्रकाश नारायण संत' आपल्यात नसल्यामुळे आता त्यांच साहित्य वाचायला मिळणार नाही या सर्व गोष्टींच दुःख एकत्रित ओघळत होत अस वाटल.
अजूनही त्या अनुभवातून बाहेर आलोय अस वाटत नाही.


आधी ठरवल्याप्रमाणे त्या निरागसपणे ही पुस्तके परत लगेच वाचायला घेईन असे वाटत नाही.

(लोभस व्यक्तिरेखा हा शब्दप्रयोग लंपन च्या बाबतीत पु.लं.नी 'वनवास' च्या प्रतिसादात वापरला आहे, साहजिक तिथून उचलला आहे.) 

No comments: