काल पुन्हा एकदा 'द डार्क नाईट' पाहिला. दर वेळी तितकाच आवडतो आणि अजून जास्त पैलू समजतात अस वाटतंय :)
मला आठवतंय पहिल्यांदा हा सिनेमा २००८ साली 'विजय टॉकीज' ला हिंदी मध्ये पाहिला होता. आम्ही ५-६ जण होतो आणि पावसाळा असल्यामुळे शेजारीच एका बादलीत टप-टप पडणाऱ्या थेंबांच मस्त बॅकग्राउंड म्युजिक चालू होत! त्यामुळे मंगेश मला अजूनही शिव्या घालतो अशा ठिकाणी नेल्याबद्दल. त्यात मी बॅटमॅन चा पहिला भाग पाहिला नव्हता किंवा कथेची पुसटशीही कल्पना नव्हती त्यामुळे खर सांगायचं तर बराचसा चित्रपट डोक्यावरून गेला होता. नंतर मग कधीतरी दोन्ही भाग सलग पाहिले आणि जोकर, नोलान ह्यांच्यावर फिदाच झालो!
ख्रिस्तोफर नोलान ने इतक्या वेगळ्या तऱ्हेने बॅटमॅनची कथा सादर केलीय की तो एक कॉमिकपट राहतच नाही. वास्तवातल्या अनेक गोष्टींशी बेमालूमपणे सांगड घालून तो दाखवून देतो की प्रत्येक गोष्टीला चांगली-वाईट बाजू असते. आपल्या प्रत्येकामध्ये एक सैतान दडलेला असतोच. ग्रे-शेडच ह्याहून उत्तम उदाहरण मी अजून नाही पाहिलं. :)
त्यामुळेच इथला 'व्हाईट हिरो' - हार्वी डेन्ट शेवटी वाईटाकडे झुकताना दाखवलाय.
ह्या चित्रपटातले डायलॉगज तर मला इतके आवडले की काही वेळा फेसबुक/ओर्कुट वर टाकले होते. 'Do I look like a guy with a plan?' हा तर अप्रतिमच आहे. 'You either die a hero or you live long enough to see yourself become the villain.' हे वाक्य मला एकदम पटलं. गांधीं(विषयी)-वादात पडायचं नसल तरी मला सुभाषबाबू आणि गांधी ह्या बाबतीत ते एकदम सुसंगत वाटत. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही सर्वोच्च स्थानावर असतानाच निवृत्ती घेण चांगल. नाहीतर (आपल्याच चाहत्यांकडून) आपली होणारी वाताहात पाहावी लागते याची आपल्याकडे अनेक उदाहरणे आहेत. असाच अजून एक जोकर च्या तोंडी असणारा जबरी डायलॉग म्हणजे 'If you're good at something, never do it for free.' मला वाटतय आजच्या कॉर्पोरेट युगात तर हा मंत्र सगळेचजण कवटाळतात :)
चित्रपटभर तसा कमी वावर असूनदेखील सर्वात जास्त प्रभाव पाडतो तो जोकर! जोकरचे संवाद ऐकून बऱ्याच वेळी बरोबर काय आणि चूक काय असा संभ्रम पडावा अशी स्थिती निर्माण होते. Heath Ledger ने ही भूमिका खरच अजरामर केलीय! त्याची बोलण्याची शैली, देहबोली निव्वळ लाजवाब आहे.
आपल्या समाज व्यवस्थेमधले कच्चे दुवे त्याने चांगलेच हेरलेत. त्यामुळेच त्याला कुठलीही गोष्ट 'प्लॅन' नुसार घडलेली आवडत नाही अस सांगतो. ' Introduce a little anarchy. Upset the established order, and everything becomes chaos.' - हे तर हरघडी आपण अनुभवतो :) मागच्या पोस्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे पुण्यातल्या वाहतुकीचाही असाच 'chaos' होतो :)
जोकरचा अजून एक बिनतोड युक्तिवाद म्हणजे बॅटमॅन असेल तरच जोकर च्या असण्याला अर्थ आहे!!!
काल मला जोकर ला पाहताना अचानक 'लखोबा लोखंडे' ची आठवण झाली! (मी जोकर, लखोबा लोखंडे असे एकेरी उल्लेख करतोय खर, पण ह्या दोन्ही अभिनेत्यांविषयी प्रचंड आदर बाळगूनच. त्यांना एकेरी बोलावण्यातच त्या व्यक्तिरेखेच यश आहे अस मला वाटत). हां, तर मला 'तो मी नव्हेच' मधल्या 'प्रभाकर पणशीकरांनी' अजरामर केलेल्या व्यक्तिरेखेची का आठवण व्हावी? खर तर तशी ह्या दोघा खल(!)नायकांची जातकुळी वेगळी आहे. एकाला वेगवेगळ्या रुपात जाऊन गुन्हे करून सहीसलामत सुटण्यात आनंद मिळतो तर दुसरा आपली ओळख मागे ठेवून आपली दहशत निर्माण करत राहतो. पण दोघेही आपल्या खऱ्या रुपात पुढे येणे टाळतात.
ह्या दोघांमध्ये मला काही बाबतीत कमालीच साम्य आढळलं ते म्हणजे अतिशय थंड डोक्याने वावरणे आणि कमालीचा बेफिकीरपणा! 'तो मी नव्हेच' खूप वर्षांपूर्वी पाहिलंय, पण लखोबा लोखंडे चा कोर्टातला वावर आणि देहबोली अजून लक्षात आहे. त्याच्यावरचे आरोप वाचून दाखवून असताना 'काय चिल्लर गोष्टी चालू आहेत' अशा अर्थाचे प्रेक्षकांकडे बघून टाकलेले कटाक्ष, टोपीशी चालू असलेला चाळा आणि हाताच्या बोटांची हालचाल पाहिली की तो सगळ्यांना अगदी वेड्यात(मापात) काढतोय अस वाटत :) त्यातला अस्सल बेरकीपणा पणशीकरांनी अगदी तंतोतंत उभा केलाय.
तसाच जोकर हॉस्पिटल उडवून बाहेर येतानाच्या त्याच्या प्रतिक्रिया किंवा Bruce Wayne च्या पार्टी मधला प्रसंग आठवा!
अत्रेंच्या लिखाणावर बोलण्याची पात्रता नाही पण माझी 'नरोटी' अशी आहे की लखोबा लोखंडे जे काही करतो ते काही निव्वळ पैशासाठी नाही. त्याला त्या सगळ्यातून एक आनंद मिळत असावा. जस जोकर पैशाच्या राशीला आग लावतो आणि म्हणतो की मी फक्त माझा वाटा जाळलाय! वाह रे पठ्ठ्या! :)
ह्या दोन्ही महान कलाकृती आहेत त्यामुळे अजून पाहिल्या नसतील तर जरूर पहाच आणि एकदा पाहिलं असेल तर मला खात्री आहे पुन्हा पाहायला नक्की आवडेल तुम्हाला :)
आपल्या प्रतिक्रियांच स्वागत! :)
ता.क. 'नरोटी' हा शब्द मी 'खोपडी' अशा अर्थाने वापरला - इरावती कर्वे यांच्या 'युगांत' मधून ढापून :p (सौजन्य: सुजयशी झालेली चर्चा :) )
ह्याच पुस्तकातून मला माझी बडबड बिनधास्त ब्लॉग वर टाकण्यासाठी प्रेरणा मिळाली :D त्या म्हणतात - "बोलण्या-लिहिण्या मागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे हा."
(Batman च उत्तम परीक्षण इथे पहा - http://apalacinemascope.blogspot.com/2008/08/blog-post_18.html )
6 comments:
Mala tar vatale Batman cha Hero Jokerach hota
Yes, I agree. negavtie shade madhye asala tari chitrapataacha khara hero(!) Jokerch aahe.
Nice Article!
Dark Knight is one of my fav and Nolan is the best!
Going forward, I would suggest you to watch "The Prestige" if you haven't seen yet!
Keep it up!
I like ur review & Now I have added another task to my To Do List - that is to watch these movies .. One thing i really liked is Marathi writing ..i dont know abt it :) .. I haven't seen the movie u talked abt .. but i like 2 share my general opinion about Movies which r character based .. good movies have one Strong character & Script runs surrounding that .. Passion of Actor & direction takes it to next level.. Negative things & Roles make impact largely & quickly than positive things..& they become popular easily too ..I believe Good or Bad r just perceptions.
--- KK
Thanks for the comments guyz.
@Deepak: Me pan Nolan cha fan jhaaloy.Inception tar 2 weLa theatre la paahila.
Prestige baghaaycha aahe, download karun thewalay :)
@KK: yeah, that holds true for many such great movies. As u said good/bad is just perception. Everything is relative :)
Very nice review. Now this is added in things to do list.
Post a Comment