Tuesday, April 26, 2011

'सहेला रे'

'सहेला रे' हा एक सुंदर कार्यक्रम काही दिवसांपूर्वी (फेब्रुवारी मध्ये) झाला होता. त्यादिवशी मी अक्षरशः out of this world होतो! त्या रात्रीच हे लिहून ठेवलं होत पण पोस्ट कराव की नको कळत नव्हत :) करून टाकतो आता एकदाचं! :D

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका अप्रतिम संगीत महोत्सवाला उपस्थिती लावण्याचा योग ह्या वीकेंडला आला. योगच तो, कारण शुक्रवार रात्रीपर्यंत माझं घरी (न) जाण्याच निश्चित नव्हतं त्यामुळे सगळ अधांतरीच होत. किशोरीताईंना वसंतोत्सव मध्ये ऐकण्याची संधी ३ वर्षांपूर्वी मी गमावली होती त्यामुळे ती हुरहूर होतीच. :)
अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. संगीतातले वेगवेगळे प्रवाह एकत्र आणून एक वेगळा अनुभव देण्याचा त्यांचा प्रयत्न खूपच छान होता. यामागची भूमिका विशद करणारा त्यांचा लेख इथे पहा.

किशोरीताईंच्या सत्काराला ३ पिढ्यांमधली वेगवेगळ्या घराण्यातली दिग्गज मंडळी उपस्थित होती. अभूतपूर्व असा सोहळा होता तो. ताईनी श्रोत्यांना वंदन केल आणि सांगितलं की हेच माझे दैवत आहेत, सगळ्यांचे डोळे पाणावले होते त्या हृद्य प्रसंगी.

सुरुवात झाली शनिवारी संध्याकाळी उस्ताद अमजद आली खां यांच्या सरोद वादनाने. १-२ महिन्यात परत त्यांना ऐकणं म्हणजे पर्वणीच होती :)
वेगवेगळ्या घराण्याच्या गायकांचे एकत्रित गायन, विविध वाद्यांचा एकत्रित मिलाफ अशी अपूर्व पर्वणीच रसिकांना मिळाली होती. त्यामुळेच रुद्रवीणेसारख वेगळ वाद्य, 'नॅन्सी' कुलकर्णी यांच व्हायोलीन सदृश वाद्य, कौशिकी चक्रवर्तींच बहारदार गायन, आणि सतार, संतूर व बासरी यांचा एकत्रित आविष्कार असे विविध कलाविष्कार अनुभवता आले! 
कौशिकी चक्रवर्तींच गाणं खूपच आवडल. त्यासोबत त्यांच्या वागण्या बोलण्यातील मार्दव, नम्रता सुद्धा! :) (त्यांचा कार्यक्रम पुण्यात असल्यास मला सांगा. दगडूशेठ महोत्सवात ह्या वर्षी होत्या, पण मी नाही जाऊ शकलो.)

या सोहळ्याची सांगता झाली अशाच एका भन्नाट कल्पनेने. दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय तालवाद्यांची जुगलबंदी नव्हे तर एकाच तालाकडे जाण्याचा मंत्रमुग्ध करणारा प्रवास असंच त्याच वर्णन कराव लागेल!
माईक/स्पीकर टेस्टिंग म्हणजे प्रेक्षकांना एरवी कंटाळवाण्या वाटणाऱ्या प्रकारामध्ये झाकीर हुसेननी श्रोते, कलाकार, तंत्रज्ञ यांची फिरकी घेत छान माहौल तयार केला.
झाकीर हुसेन यांचा तबला आणि साबीर खान यांची सारंगी पहिल्यांदाच ऐकत होतो.
विकू विनायकराम या ज्येष्ठ कलाकाराचं घटम, त्यांचा मुलगा व्ही. सेल्वागणेश आणि नातू स्वामिनाथन यांच खंजिरा आणि सोबतीला कर्नाटकी गायन; क्या बात है! :)

भवानीशंकर यांच 'गजराजाच्या' चालीप्रमाणे भासणारे पखवाज वादन तर लाजवाब!
साबीर खान यांनी टेस्टिंगच्या वेळी सारंगी वरून बोटे फिरवली आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला :) आणि ही तर फक्त सुरुवात होती! त्यानंतर प्रत्येक वाद्याच्या तुकड्या नंतर नुसता टाळ्या, शिट्ट्यांचा पाऊस चालू होता. उपस्थित सर्व श्रोते निव्वळ भारावून गेले होते. घटम कडे बघून तोंडात बोटे घालणेच बाकी होते! मला तर भीती वाटत होती की हा घडा फुटत कसा नाही :p
खंजिरा(kanjira) म्हणजे तर एक आश्चर्यच आहे. एवढूस्से वाद्य आहे ते, काय कौशल्य लागत असेल त्यातून इतके वेगवेगळे ध्वनी निर्माण करायला! Simply amazing!!! 
या दोन्हीच्या सोलो नंतर मध्येच पखवाज ची दमदार थाप एक वेगळाच नाद निर्माण करत होती :) अशी दमदार थाप भवानीशंकरच देवोत!
आणि तरीसुद्धा या सर्व वाद्यात उस्तादांचा तबल्यावरचा ठेका वेगळाच sharpness घेऊन येत होता! Distinctly remarkable!

ह्या संपूर्ण कार्यक्रमात एक क्षण देखील मला उसंत मिळाल्याचं आठवत नाही! एकदम भारावून गेलो होतो कार्यक्रम संपताना आणि सर्व श्रोत्यांची अशीच इच्छा होती की हा जादुई स्वरांचा वर्षाव असाच अखंड चालू राहावा! शेवटची जुगलबंदी अशी काही रंगली होती की सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात वन्स मोर ची मागणी केली पण उस्तादांनी त्यांच्या मजेशीर शैलीत सांगितलं की सर्वांचीच कशी दमछाक झाली आहे :)
 

मुळात 'सहेला रे' ही ताईंची स्वरचित बंदिश जितकी सुरेख आहे तितकाच सुरेख कार्यक्रम आयोजित करून ते शीर्षक समर्पक ठरवलं! 

आम्ही सर्वजण परत असा योग कधी येईल याचा विचार करत बाहेर निघालो ते त्या अद्वितीय कार्यक्रमाच्या सुंदर आठवणी सोबत घेऊन आणि कानामध्ये ते रम्य सूर साठवून... 


संयोजकांना ह्या सुंदर अनुभवाबद्दल जितके धन्यवाद द्यावेत तितके थोडेच आहेत. असेच सुंदर कार्यक्रम भविष्यात ऐकायला मिळोत ही इच्छा :)

No comments: